ढोकळा हा लोकप्रिय आणि आवडीने खाल्ला जाणारा नाश्ता आहे. करायला अगदी सोपा असतो शिवाय वाफवलेला असतो त्यामुळे पचायला सोपा असतो. (instant Dhokla recipe - Delicious and nutritious Dhokla made from moong dal is very special for breakfast, see the recipe)विविध प्रकारचे ढोकळे केले जातात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे मूगडाळीचा ढोकळा. करायला अगदीच सोपा आहे. पौष्टिक आणि चविष्ट होतो. पाहा कसा करायचा.
साहित्य
हिरवी मूगडाळ, हिरवी मिरची, आलं, दही, हळद, मीठ, इनो, तेल, मोहरी, तीळ, कोथिंबीर
कृती
१. सगळ्यातआधी मूगडाळ स्वच्छ धुऊन घ्यायची. त्यानंतर ती किमान ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे डाळ मऊ होते आणि वाटायला सोपी जाते. रात्रभर भिजवली तर उत्तम.
२. भिजलेली मूगडाळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालायची. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आल्याचा लहान तुकडा सोलून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात घालायचा. आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घाला ते मिश्रण बारीक वाटून घ्यायचे.
३. तयार झालेलं पीठ एका भांड्यात काढा. त्यात दही, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घाला. हे सगळं मिश्रण नीट ढवळून घ्या, जेणेकरुन सगळे पदार्थ एकजीव होतील. त्यात तुकडे किंवा अख्खी डाळ राहणार नाही याची काळजी घ्यायची.
४. ढोकळा वाफवण्यासाठी ताट किंवा साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यामुळे ढोकळा चिकटत नाही. ताटात थोडे पांढरे तीळ घालायचे. ढोकळ्याचं पीठ तयार झाल्यावर शेवटी त्यात इनो किंवा खायचा सोडा घालायचा. त्यावर एक-दोन चमचे पाणी घाला आणि हलक्या हाताने पटकन ढवळा. यामुळे पिठात हलके बुडबुडे तयार होतात आणि ढोकळा मऊ व स्पॉजी होतो.
६. लगेच हे पीठ तेल लावलेल्या ताटात ओता आणि एकसमान पसरवून घ्यायचे.पीठ जास्त पातळ करु नका. त्याचा चांगला ढोकळा होत नाही. आधीच गरम केलेल्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये हे ताट ठेवा आणि मध्यम आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे वाफेवर शिजू द्या. २० मिनिटांनी सुरीच्या मदतीने ढोकळा शिजला आहे का ते तपासा.
६. एका फोडणीपात्रात तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात मिरची घालायची. गॅस बंद करुन नंतर त्यात तीळ आणि हळद घाला. फोडणी ढोकळ्यावर ओता. बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घाला. फोडणीत घातली तरी चालेल.
