लोणचं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. भात असो किंवा चपाती सोबत लोणचं असेल तर जेवणाची रंगत वाढते. लोणच्यातही अनेक प्रकार आहेत. आंब्यांच असतं लिंबाचं असतं मिरचीचं असतं आणि भाज्यांचही असतं. मिरचीचे लोणचे करण्याची सोपी रेसिपी पाहा. (Instant chilli pickle - 10 minutes recipe, must try recipe for spicy lovers )ते ही इंस्टंट लोणचे आहे. भाजी करायची नसेल तर असे लोणचे करा आणि बिनधास्त खा. दहा मिनिटांत होते.
साहित्य
हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरे, काळीमिरी, धणे, मोहरी, बडीशेप, मेथी, तेल, लाल तिखट, लिंबू
कृती
१. ताजी हिरवी मिरची घ्यायची. स्वच्छ धुवायची. कोरड्या फडक्याने पुसून सुकवायची. त्याची देठ काढायची आणि मिरचीचे तुकडे करायचे. लांब , पातळ, बारीक , उभे तुम्हाला जसे आवडतात तसे करा.
२. एका कढईत चार चमचे जिरे घ्यायचे. तेवढेच धणे घ्यायचे आणि तेवढीच बडीशेपही घ्यायची. तिन्ही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे. थोडी काळीमिरी घ्यायची. तसेच थोडी मोहरी घ्यायची. मेथीचे चार दाणे घ्यायचे. सगळे मसाले मस्त भाजून घ्यायचे. खमंग भाजायचे आणि गार करत ठेवायचे. गार झाल्यावर त्याची पूड तयार करायची. मिक्सरमधून वाटून लोणचं मसाला तयार करायचा.
३. एका खोलगट भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात वाटलेला मसाला घालायचा. तसेच थोडी हळद घालायची. त्यात लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे. कालवून झाल्यावर झाकून ठेवायचे.
४. तेल गरम करायचे आणि लोणच्यावर ओतायचे. चारे ते पाच चमचे तेल पुरते. तेल ओतल्यावर लगेच लिंबाचा रसही घालायचा. लिंबामुळे चव मस्त लागते आणि मिरची पचायलाही सोपी होते. त्यामुळे लिंबाचा रस विसरु नका. तो हवाच, नसेल तर मिरची उग्र लागेल. सगळे पदार्थ एकजीव करायचे. पूर्णपणे गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे.
