चाटचे पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटते. गोड, तिखट, आंबट, खारट सगळ्या चवींचा समावेश या पदार्थांमध्ये असतो. पाणीपुरी असो किंवा शेवपुरी एकदा खायला सुरवात केली की पोट भरले तरी मन भरताभरत नाही. (If you are a fan of SPDP, make these quick Shevpuri-Dahipuri at home in 10 minutesl - an explosion of flavor)असाच एक चाटचा मस्त प्रकार म्हणजे दही पुरी. भरल्यावर लगेच खाल्ली तर मज्जा येते. त्यामुळे पार्सल वगैरे करुन खाता येत नाही. विकत खाण्यापेक्षा घरीच झटपट करा आणि खा. अगदी चाटवाल्याकडे मिळते तशीच घरी करता येते. फार सोपा पदार्थ आहे. नक्की करुन पाहा.
साहित्य
पाणीपुरीच्या पुऱ्या, बटाटा, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, दही, चिंच, मीठ, लाल तिखट, पाणीपुरी मसाला, कांदा, टोमॅटो, शेव, चाट मसाला
कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा. गार करायचा आणि सालं सोलून घ्यायची. नंतर कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात थोडा पुदिना टाकायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. थोडे पाणी घाला आणि चटणी वाटून घ्या. पाणी कमीच घालायचे. घट्ट चटणी वाटायची.
२. एका भांड्यात गरम पाणी घ्यायचे. त्यात चिंच भिजवायची. पाणी गार झाले की चिंच कुस्करुन घ्यायची आणि मग गाळून घ्यायची. त्यात चमचाभर चाट मसाला घालायचा. बटाटे कुस्करुन घ्यायचे. त्यात चमचाभर चाट मसाला, चमचाभर लाल तिखट, पाणीपुरी मसाला आणि गरजेनुसार मीठ घालायचे. सारण कालवून घ्यायचे.
३. एका ताटलीत पाणीपुरीच्या पुऱ्या मधे फोडून लावायच्या. त्यात बटाटा भरायचा. त्यात बारीक चिरलेला कांदाही भरायचा. नंतर टोमॅटोही भरा आणि वरतून हिरवी चटणी घाला. चिंचेची चटणीही घाला आणि लाल तिखट घाला. पाणीपुरी मसाला घाला आणि मग दही जरा फेटून घालायचे. दह्यावर शेव घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी चटणी घालायची.
