थंडीतसुद्धा दह्याचा (Curd) आहारात समावेश केल्यानं बरेच फायदे मिळतात. दही तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरते. दही खाल्ल्यानं प्रोटीन, व्हिटामीन बी-१२ तसंच गुड बॅक्टेरिया मिळतात. दही खाल्ल्यानं जेवणाची चवसुद्धा वाढते. म्हणून रोज १ वाटी दह्याचा आहारात समावेश करायलाच हवा. घरी बनवलेलं दही मार्केटपेक्षा जास्त क्रिमी आणि टेस्टी असते. हिवाळ्याच्या दिवसांत दही लावणं खूपच कठीण होतं कारण वातावरणात गारवा असतो. दूध थंड असेल, ऊबदार जागी ठेवलं नसेल तरीही दही व्यवस्थित लागत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही खास ट्रिक्स वापरू शकता. (How To Set Curd At Home In Winter)
पहिली पद्धत
दही लावण्यासाठी सगळ्यात आधी गरम दूध घ्या. दूध गरम करून घ्या नंतर कोमट होईपर्यंत वाट पाहा. दुधात बोट बुडवू शकाल इतकं थंड करून घ्या. एका भांड्यात १ ते २ चमचे घट्ट दही घाला. त्यात दूध घाला.नंतर हे भांडं अशा टिकाणी ठेवा जिथे फार गारवा जाणवणार नाही. मायक्रोव्हेव्हच्या आत किंवा एखाद्या गरम डब्यात ठेवा किंवा गरम कापडानं झाकून ठेवा. तुम्ही टॉवेल किंवा दुसऱ्या गरम कापडाचासुद्धा वापर करू शकता. हे दुधाचं भांडं ८ तासांसाठी तसंच राहू द्या. जर तुम्ही रात्री दही लावत असाल तर सकाळी घट्ट दही तयार झालेलं असेल.
दुसरी पद्धत
गरम दूध घेऊन हलकसं फेटून घ्या. जेव्हा दूध कोमटपेक्षा अधिक गरम असेल तेव्हा चपातीच्या डब्यात किंवा दुसऱ्या जेवण गरम ठेवणाऱ्या भांड्यांत ठेवा. त्यात १ ते २ चमचे दही घाला आणि झाकण लावून ८ तासांसाठी तसंच ठेवून द्या. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही ही ट्रिक वापरू शकता ज्यामुळे घट्ट मलाईदार दही बनून तयार होईल.
तिसरी पद्धत
वरच्या दोन पद्धती तुम्हाला किचकट वाटत असतील तर तिसरी एक सोपी पद्धत म्हणजे घरातील कोणतंही जाड कापड जे ऊबदार असेल ते पसरवून घ्या. दह्याचं भांडं यात मावेल इतकं उबदार कापड असावं. विरजण आणि दूध एका भांड्यात एकत्र करून झाल्यानंतर त्या उबदार कापडात गुंडाळून ठेवा. ८ तासात दही पूर्णपणे तयार झालेलं असेल.
