सकाळी शाळेत किंवा कॉलेजला जाताना मुलांना डब्यात दिलेल्या पोळ्या कडक होतात, वातड होतात अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पोळ्या वातड झाल्या असतील तर मुलांनाही खायला नको वाटतात. मऊसूत पोळ्या असतील तर मुलं डब्यात दिलेलं सर्व जेवण संपवतात. पोळी करणं आणि आणि ती बराचवेळ मऊ ठेवणं कोणत्याही टास्कपेक्षा कमी नसतं.
कणीक खूप घट्ट मळली तर पोळ्या कडक होतात. कणीक नेहमी मऊ मळावी. कणीक मळताना त्यात थोडं तेल किंवा तूप घालावं अन्यथा पोळ्यांमधील ओलावा लवकर उडून जातो. कणीक मळल्याबरोबर लगेच पोळ्या केल्यास त्या मऊ राहत नाहीत. कणीक किमान १५ ते २० मिनिटं झाकून ठेवणं आवश्यक आहे.
पोळी लाटताना जर खूप जास्त कोरडे पीठ लावले तर पोळी तव्यावर टाकल्यावर कोरडी पडते आणि वातड होते. पोळी खूप जास्त पातळ लाटल्यास ती पापडासारखी कडक होते आणि जाड राहिल्यास नीट भाजली जात नाही. जर तवा कमी गरम असेल तर पोळी जास्त तव्यावर राहते आणि त्यातील ओलावा संपल्यामुळे ती वातड होते.
पोळी मऊ राहण्यासाठी काय करावं?
कंटेंट क्रिएटर भाग्यश्री सांगतात की, सगळ्यात आधी कणीक भिजवून ठेवावी. १० मिनिटं का होईना कणीक भिजवल्यानंतर बाजूला ठेवा. नंतर तेल लावून कणीक व्यवस्थित मळून घ्या. जेव्हा आपण पोळी भाजतो तेव्हा ती तेल लावून न भाजता अशीच भाजावी. कारण भाजताना तेल लावले तर ती थोड्या वेळानं कडक होते किंवा चिवट होते.पोळी भाजून खाली आल्यानंतर त्यावर तूप किंवा तेल लावावं मग डब्यात भरावी.
डब्यात भरण्याची घाई नको
पोळी तव्यावरून काढल्याबरोबत लगेच डब्यात भरली तर त्याला वाफ सुटते. त्या वाफेचं पाणी होऊन खालची पोळी भिजते. पोळी भाजल्यावर ती कापडात न गुंडाळता तशीच बाहेर ठेवली तर हवेमुळे ती कडक होते. डब्यात पोळ्या ठेवताना त्या फॉईल पेपर किंवा एका सुती रुमालात गुंडाळून ठेवल्यास उत्तम.
