हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बहुतेकदा रोटी किंवा चपाती खाण्यापेक्षा तंदुरी रोटीच खाणं पसंत करतो. हॉटेलमध्ये आवर्जून मागवली जाते ती गरमागरम, मऊसूत तंदुरी रोटी सगळ्यांच्याच विशेष आवडीची... ही पांढरीशुभ्र लुसलुशीत तंदुरी रोटी तर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चमचमीत, चटपटीत ग्रेव्हीच्या भाज्यांसोबत खायला अधिकच चविष्ट लागते. बाहेरून किंचित कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असणारी ही रोटी घरी तयार करणं कठीण वाटतं, कारण आपल्याकडे हॉटेलसारखा मोठा 'तंदूर' नसतो. इतकंच नाही तर घरी तयार केलेली तंदुरी रोटी हॉटेलमध्ये अगदी तशीच आणि परफेक्ट चवीची होईल की नाही अशी शंका देखील येतेच...पण प्रत्यक्षात मात्र, फक्त साध्या प्रेशर कुकरच्या मदतीने घरच्याघरीच अगदी हॉटेलसारखी परफेक्ट तंदुरी रोटी तयार करता येते(how to make tandoori roti without tandoor).
ना ओव्हनची गरज, ना तंदूरची...आपण साध्या प्रेशर कुकरचा वापर करून अगदी हॉटेलच्या चवीची तंदुरी रोटी मिनिटभरात तयार करू शकता. फक्त एक सोपी ट्रिक आणि काही घरात असणारे साहित्य पुरेसे असते..या सोप्या पद्धतीमुळे (cooker tandoori roti recipe) रोटी होते मऊ, फुललेली आणि स्वादिष्ट, अगदी रेस्टॉरंट स्टाईल..कोणत्याही महागड्या ओव्हनशिवाय किंवा तंदूरशिवाय, कुकरमध्ये रोटी करण्याची ही एक 'मॅजिकल ट्रिक' आहे. ही रोटी कशी बनवायची, पीठ कसं मळायचं आणि कुकरचा (instant tandoori roti at home) वापर नेमका कसा करायचा, याची सोपी पद्धत पाहूयात..
तंदुरी रोटी खाण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील तंदूरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण, तंदूरशिवाय तुम्ही घरातील कुकरमध्येच तंदुरी रोटी बनवू शकता. प्रसिद्ध यूट्यूबर रेणू चौहान यांनी अवघ्या ५ मिनिटांत तंदुरी रोटी बनवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. यामध्ये तुमचा नियमित प्रेशर कुकरच 'तंदूर'चे काम करेल.
१. परफेक्ट पीठ मळण्याची पद्धत :- खऱ्या तंदुरी रोटीची चव ही, ती किती मऊ आणि टम्म फुगलेली आहे, यावर अवलंबून असते. हॉटेलसारखी रोटी घरी तयार करण्यासाठी सर्वात आधी २ कप मैदा आणि १ कप गव्हाचे पीठ घ्या. यामध्ये १ छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घालून नीट मिक्स करा. हे दोन्ही घटक रोटीला छान फुलवण्याचे काम करतात, ज्यामुळे ती हॉटेलसारखी जाळीदार आणि मऊ होते. एका बाऊलमध्ये १ कप कोमट दूध, अर्धा कप दही, १ चमचा साखर, १ चमचा मीठ आणि २ चमचे तेल एकत्र करून त्याचे द्रावण तयार करून घ्या. तयार केलेल्या या मिश्रणाच्या मदतीने पिठाचा मऊ गोळा मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर त्याला थोडे तेल लावा आणि कापडाने झाकून किमान ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...
२. प्रेशर कुकरला करा 'इन्स्टंट तंदूर' :- या रेसिपीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रेशर कुकरचा तंदूर म्हणून केलेला वापर. सवर प्रेशर कुकर नेहमीप्रमाणे सरळ न ठेवता तो उल्टा (पालथा) करून ठेवा. कुकर गॅसवर ठेवण्यापूर्वी त्याची शिट्टी आणि गॅसकेट आवर्जून काढून टाका. कुकर मध्यम ते हाय फ्लेमवर चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या. कुकरचा बाहेरील भाग आता तुमच्यासाठी 'तंदूर'चे काम करेल. जेव्हा कुकर पूर्णपणे आणि कडक गरम होईल, तेव्हाच त्यावर रोटी चिकटवा.
पुणे-सोलापुरात फेमस डिस्को भाजी, नाव अजबगजब पण चव भन्नाट-पाहा चमचमीत रेसिपी...
३. रोटी लाटण्याची पद्धत आणि खास फ्लेवर :- तंदुरी रोटी कुकरवर व्यवस्थित चिकटावी आणि तिची चव लाजवाब लागावी यासाठी ही पद्धत वापरा. पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्या. थोडे कोरडे पीठ लावून ही रोटी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड लाटा. लाटलेल्या रोटीवर थोडे बारीक कापलेले लसूण, थोडी कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. ही सर्व सामग्री पिठात नीट दाबली जावी यासाठी हलक्या हाताने पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घ्या. आता रोटी उलटी करा आणि तिच्या दुसऱ्या बाजूला (ज्या बाजूला कोथिंबीर नाही) व्यवस्थित पाणी लावा. ही पाण्याची बाजू गरम कुकरवर टाका. पाण्यामुळे रोटी कुकरला घट्ट चिकटते आणि तंदूरसारखी छान भाजली जाते.
४. कुकरवर रोटी चिकटवणे आणि भाजण्याची पद्धत :- रोटीची पाण्याची बाजू गरम कुकरच्या उलट्या भागावर हळूवारपणे चिकटवा. तुम्ही तुमच्या कुकरच्या आकारानुसार एकाच वेळी ३ ते ५ रोट्या कुकरच्या बाजूला लावू शकता. काही मिनिटांतच रोटी फुगायला सुरुवात होईल. जेव्हा रोटीवर छोटे-छोटे बुडबुडे दिसू लागतील, तेव्हा समजावे की ती खालून नीट शिजली आहे. आता कुकरचे हॅण्डल काळजीपूर्वक पकडा आणि कुकर उचलून गॅसच्या आचेवर थोडा लांब धरून चहूबाजूंनी फिरवून रोट्या नीट भाजून घ्या. यामुळे रोटीला हॉटेलसारखा तो तांबूस-तपकिरी रंग आणि कुरकुरीतपणा येईल.
५. बटर लावून वाढेल स्वाद :- जेव्हा रोटी सोनेरी-तपकिरी रंगाची होईल आणि त्यावर तंदूरसारखे गडद चट्टे दिसू लागतील, तेव्हा समजावे की तुमची तंदुरी रोटी तयार आहे. चिमटा किंवा चाकूच्या साह्याने रोटी हळूवारपणे कुकरपासून वेगळी करा. या गरमागरम रोटीवर भरपूर बटर लावा. यामुळे रोटीला एक वेगळीच चव आणि मऊपणा येतो. ही गरमागरम तंदुरी रोटी आपण दाल मखनी, शाही पनीर किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत सर्व्ह करू शकता.
या सोप्या ट्रिकमुळे तुमची कुकरमधील तंदुरी रोटी चवीला अगदी रेस्टॉरंटसारखीच खुसखुशीत आणि मऊ लागेल.
Web Summary : Make restaurant-style tandoori roti at home using a pressure cooker! This simple trick requires no oven or tandoor. Knead dough with milk and bake on inverted cooker for soft, delicious results.
Web Summary : अब घर पर प्रेशर कुकर से बनाएं रेस्टोरेंट जैसी तंदूरी रोटी! इस आसान ट्रिक में ओवन या तंदूर की ज़रूरत नहीं है। दूध से आटा गूंथें और उल्टे कुकर पर नरम, स्वादिष्ट रोटी सेंकें।