पाणीपुरी (Pani puri) हा भारतीयांच्या आवडीचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. नेहमी नेहमी बाहेरच्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खाणं योग्य नाही कारण यामुळे अनेक पोटाचे विकार उद्भवू शकतात. जर तुम्हाला पाणीपुरी खूपच आवडत असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीनं घरच्याघरी पाणीपुरी बनवू शकता. पाणीपुरी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To make Street Style Pani puri At Home)
कुरकुरीत रव्याची पुरी करण्याची सोपी पद्धत
रव्याची पुरी करण्यासाठी २ कप बारीक रवा घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि २ चमचे कडकडीत गरम तेल घाला. आता कोमट पाण्याचा वापर करून पीठ घट्ट मळून घ्या. हे पीठ ओल्या कापडानं झाकून किमान ३० मिनिटं बाजूला ठेवा. जेणेकरून रवा नीट फुलेल. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून अगदी पातळ पुऱ्या लाटाव्यात. कढईत तेल चांगले कडकडीत गरम करून घ्या आणि मध्यम आचेवर पुऱ्या तळाव्यात. पुऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत झाल्या की बाहेर काढा.
तिखट पाणी करण्याची योग्य पद्धत
पाणीपुरीची खरी चव त्याच्या तिखट पाण्यात असते. हे पाणी करण्यासाठी १ कप कोथिंबीर, अर्धा कप पुदीना, ३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि आल्याचा १ छोटा तुकडा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा. हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून यात १ लिटर थंड पाणी घाला.
चव अधिक येण्यासाठी त्यात १ चमचा भाजलेली जिरे पूड, १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ आणि लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ घाला. शेवटी या पाण्यात बारीक खारी बुंदी घाला. या सोप्या पद्धतीनं घरगुती, हायजेनिक आणि चवदार पाणीपुरी तयार होईल.
पुरीमध्ये बटाटा, रगडा, तिखट पाणी आणि थोडी चटणी भरून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. याच पद्धतीनं तुम्ही शेवपुरीसुद्धा तयार करू शकता. शेवपुरीसाठी बटाटा शिजवाल तेव्हा तो जास्त शिजवू नका. मध्यम शिजवा. यामुळे परफेक्ट सुसंगता येईल.
