Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकत मिळतो तसा स्पंजी जाळीदार खमन ढोकळा घरीच करा; सोपी रेसिपी, १० मिनिटांत नाश्ता तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:18 IST

How To make spongy khaman dhokla at home : स्पंजसारखा आणि लुसलुशीत ढोकळा बनवण्यासाठी योग्य प्रमाण आणि काही खास टिप्स पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

सकाळच्या नाश्त्याला काय करावे सुचले नाही तर तुम्ही झटपट ढोकळा करू शकता. ढोकळा चवीला खूपच चांगला आणि चवदार असतो. ढोकळा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. ढोकळा खाल्ल्यानं तुम्हाला दिवसभर एनर्जेटीक वाटेल. स्पंजसारखा आणि लुसलुशीत ढोकळा बनवण्यासाठी योग्य प्रमाण आणि काही खास टिप्स पाळणे अत्यंत आवश्यक आहे. (How To make spongy khaman dhokla at home)

सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये दीड कप बारीक चाळलेले बेसन घ्या. त्यात चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा पिठीसाखर, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाका. आता यात दीड ते दोन चमचे लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड आणि एक मोठा चमचा तेल घालून थोडे थोडे पाणी टाकत मिश्रण एकाच दिशेने फेटून घ्या. मिश्रणाची कन्सिस्टन्सी खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी. हे पीठ किमान ५-१० मिनिटे एकाच दिशेने जोरात फेटल्यामुळे त्यात हवा भरली जाते, ज्यामुळे ढोकळा जाळीदार होतो. हे पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा. (Easy recipe of Khaman Dhokla)

दरम्यान, स्टीमरमध्ये किंवा मोठ्या कढईत पाणी गरम करायला ठेवा आणि ज्या भांड्यात ढोकळा लावायचा आहे त्याला तेलाचा हात लावून ग्रीस करा. पिठाला थोडा वेळ विश्रांती दिल्यानंतर, त्यात एक पाकीट 'ईनो' (फ्रूट सॉल्ट) टाका आणि त्यावर एक चमचा पाणी घालून ते लगेच सक्रिय करा. ईनो टाकल्यावर मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने एकाच दिशेने फेटून घ्या, तुम्ही पाहाल की पीठ लगेच फुगून दुप्पट झाले आहे. आता हे मिश्रण लगेच ग्रीस केलेल्या भांड्यात ओता आणि मध्यम ते मोठ्या आचेवर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. ढोकळा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यात सुरी घालून तपासा. जर सुरी स्वच्छ बाहेर आली, तर ढोकळा तयार आहे.

ढोकळा थंड झाल्यावरच त्याचे काप करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फोडणी. एका लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि भरपूर तीळ घाला. या फोडणीत थोडे पाणी आणि साखर टाकून ते उकळून घ्या. ही कोमट फोडणी ढोकळ्याच्या तुकड्यांवर सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवा. यामुळे ढोकळा कोरडा न लागता अगदी रसरशीत आणि स्पंजसारखा नरम होतो. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून गरमागरम ढोकळा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Make spongy, porous Khaman Dhokla at home in 10 minutes!

Web Summary : Prepare quick, tasty Khaman Dhokla at home! Follow these easy steps for a spongy texture. Use besan, lemon juice, and fruit salt (Eno). Temper with mustard seeds, curry leaves, and sesame seeds for a delicious, energetic breakfast.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स