सकाळच्या नाश्त्याला इडली खायला सर्वांनाच आवडते पण इडली करणं वाटतं तितकं सोपं नाही. घरी केलेल्या इडल्या कडक होतात, व्यवस्थित आंबत नाहीत अशी तक्रार बऱ्याचजणांची असते (Idli Making Tips). विकत मिळते तशी पांढरीशुभ्र, मऊ आणि जाळीदार इडली घरी करण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होईल. घरच्याघरी इडली करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. (How To Make South Indian Hotel Style Soft Perfect Idli At Home)
इडली परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स
पीठ आंबायला ठेवताना त्यात अर्धा चमचा साखर घाला. यामुळे थंडीच्या दिवसातही पीठ वेगानं आंबते आणि इडलीला एक छान पांढरा रंग येतो. डाळ भिजवल्यानंतर ते पाणी फेकून न देता डाळ वाटताना तेच पाणी वापरा. या पाण्यात नैसर्गिक बॅक्टेरिया असतात जे पीठ आंबवण्याच्या प्रक्रिया अत्यंत वेगवान करतात.
जर तुम्हाला इडली कापसासारखी मऊ हवी असेल तर ३ वाटी तांदळाला पाव वाटी साबुदाणा वापरा. साबुदाणा तांदळासोबत भिजत घाला. साबुदाण्यातील स्टार्चमुळे इडलीला एक प्रकारचा स्पंजसारखी लवचिकता मिळते.
मिक्सरमध्ये डाळ वाटताना जार गरम होतो. जार गरम झाला की डाळीतील प्रथिनं खराब होतात आणि इडली फुगत नाही. वाटताना नेहमी बर्फाचे पाणी वापरा. जेणेकरून पीठ थंड राहील आणि इडली मऊ होईल.
पीठ खूपच घट्ट असेल तर इडली दगडासारखी होते आणि पातळ असेल तर पसरते. पिठात चमचा उभा केल्यावर तो सरळ उभा राहायला हवा. पण चमचा हलवल्यास पीठ सहज पडले पाहिले.
हॉटेलमध्ये इडली पात्राला तेल लावण्याऐवजी ओले सुती कापड स्टॅण्डवर पसरवतात आणि त्यावर पीठ टाकतात. यामुळे इडलीला खालच्या बाजूनं वाफ व्यवस्थित लागते आणि इडली चिकट होत नाही ती काढल्यावर तिला एक विशिष्ट टेक्स्चर मिळते.
जर तांदळाचा रंग थोडा पिवळसर असेल तर पीठ आंबवल्यानंतर त्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. यामुळे इडली पांढरीशुभ्र दिसते आणि चवही सुधारते.
जर काही कारणानं तुमचं पीठ फुगले नसेल तर त्यात थोडा इनो घालण्याऐवजी दही आणि चिमूटभर बेकिंग सोडा यांचे मिश्रण करून घाला. यामुळे इडलीला विकतच्या इडलीसारखी जाळी पडते.
