हिवाळा असो किंवा उन्हाळा गरमागरम भाकरीसोबत भाजी किंवा ठेचा खायला सर्वांनाच आवडतो. नेहमी नेहमी चपाती खाऊन कंटाळा आला तर तुम्ही मऊसूत तांदळाची भाकरी बनवू शकता. आगरी संस्कृतीमध्ये जेवणाची खरी शान म्हणजे तांदळाची भाकरी. गरम गरम मऊ, लुसलुशीत भाकरी जेवणात असेल तर जेवणाची चव दुप्पटीनं वाढते. पण अनेकदा भाकरी नीट फुगत नाही किंवा कडक होते. अस्सल आगरी पद्धतीची मऊ आणि टम्म फुगलेली भाकरी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात घ्यायला हव्यात. (Tandalachi Bhakri Recipe)
तांदळाची भाकरी परफेक्ट होण्यासाठी काय करावे?
भाकरी चविष्ट होण्यासाठी तांदूळ जुना असावा. शक्यतो वाडा कोलम किंवा स्थानिक कणसाळ तांदळाचे पीठ भाकरीसाठी उत्तम ठरते. तांदूळ व्यवस्थित धुवून सुकवून मगच दळायला द्या. पीठ खूप दिवस साठवून ठेवू नका. कारण ताज्या पिठाची भाकरी जास्त मऊ लागते.
आगरी पद्धतीत भाकरी मऊ होण्याचं मुख्य रहस्य हे उकड काढण्यात आहे. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात चवीनुसार थोडं मीठ आणि अर्धा चमचा तेल घाला. पाण्याला मोठी उकळी आल्यानंतर गॅस मंद करून त्यात तांदळाचे पीठ घाला आणि लाटण्यानं व्यवस्थित ढवळून घ्या. गॅस बंद करून ५ मिनिटं त्यावर झाकण ठेवा. या वाफेमुळे पिठाचा लवचिकपणा वाढतो.
उकड काढलेले पीठ कोमट असतानाच परातीत काढून घ्या. हाताला थोडं गार पाणी लावून पीठ एकजीव आणि मऊ होईपर्यंत मळा. पीठ जितकं जास्त मळाल तितकी भाकरी मऊ होते आणि कडा फाटत नाहीत. भाकरी थापताना हाताला थोडं कोरडं पीठ लावा. हाताच्या तळव्यांचा वापर करून गोलाकार भाकरी थापा. भाकरी जास्त जाड किंवा जास्त पातळ नसावी.
अनेक घरांमध्ये हातावर भाकरी फिरवून मोठी करण्याची पद्धत आहे ज्यामुळे ती सगळीकडून समान होते. तवा चांगला गरम झाल्यावर त्यात भाकरी घाला. भाकरीच्या वरच्या बाजूला हातानं पाणी लावा. हे पाणी सुकायच्या आतच भाकरी उलटवा. दुसरी बाजू नीट भाजरी गेली की थेट गॅसच्या आचेवर किंवा तव्यावर कापडानं दाबून फुगवा.
