Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्यासाठी १० मिनिटांत करा रवा उत्तप्पा; एकदम सोपी रेसिपी, जाळीदार, मऊ उत्तप्पा घरीच करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:40 IST

How To Make Rava Utthppa At Home : एका लहान वाटीत टॉपिंगसाठी दिलेले सर्व साहित्य (कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची) हलके मिसळून घ्या.

भारतीय नाश्त्याच्या (Breakfast) पदार्थांमध्ये रव्याला एक खास स्थान आहे. मऊ, जाळीदार भाज्यांच्या चवीनं हा उत्तप्पा परीपूर्ण असतो.  पारंपारीक उत्तप्पा करण्यासाठी डाळ-तांदूळ भिजवून वाटण्याची लांब प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण काहीतरी पौष्टीक खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही रवा उत्तप्पा सोप्या पद्धतीनं बनवू शकता. १५ मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ पचायला हलका असतो आणि लहान मुलांनाही आवडतो. खुसखुशीत रवा उत्तप्पा कसा करायचा याची सोपी, झटपट रेसिपी पाहूया.(Instant Rava Uttappam Recipe)

रवा उत्तप्पा करण्यासाठी लागणारं साहित्य

जाड रवा (सूजी) - १ कप

दही (आंबट नको) - १/२ कप

पाणी - अंदाजे १/२ ते ३/४ कप

मीठ - चवीनुसार

इनो फ्रूट सॉल्ट (किंवा सोडा) - १/२ चमचा

बारीक चिरलेला कांदा - १/४ कप

बारीक चिरलेला टोमॅटो - १/४ कप

बारीक चिरलेली कोथिंबीर - १ मोठा चमचा

बारीक चिरलेली हिरवी मिरची - १/२ चमचा (ऐच्छिक)

तेल/तूप - उत्तप्पा शेकण्यासाठी

रवा उत्तप्पा कसा करतात?

एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे-थोडे पाणी मिसळून डोसा/उत्तप्पाच्या पिठासारखे (जास्त पातळ नाही) मिश्रण तयार करा. हे मिश्रण झाकून फक्त १० मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल.

एका लहान वाटीत टॉपिंगसाठी दिलेले सर्व साहित्य (कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची) हलके मिसळून घ्या. गॅसवर तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्याला हलके तेल लावून घ्या. बॅटरमध्ये इनो फ्रूट सॉल्ट घाला आणि त्यावर १ चमचा पाणी टाकून मिश्रण हलक्या हाताने एका दिशेने मिक्स करा. इनो घातल्यावर लगेच उत्तप्पा करायला घ्या.

बॅटर खूप घट्ट वाटल्यास, गरजेनुसार पाण्याचा वापर करा. रवा भिजल्यावर पाणी शोषून घेतो, म्हणून १० मिनिटांनंतर बॅटरची कन्सिस्टन्सी तपासा.तव्यावर १ डाव बॅटर ओतून ते जाडसर (डोस्यासारखे पातळ करू नका) आणि लहान गोल आकारात पसरवा.

पसरवलेल्या उत्तप्पावर तयार केलेले भाज्यांचे टॉपिंग हलके दाबून पसरवा. बाजूने थोडे तेल किंवा तूप सोडा. उत्तप्पा एका बाजूने सोनेरी होईपर्यंत  शिजवा. नंतर हलक्या हाताने पलटा आणि दुसऱ्या बाजूनेही १-२ मिनिटे शिजवा. गरमागरम रवा उत्तप्पा नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : 10-Minute Rava Uttapam Recipe: Easy, Lacy, Soft Uttapam at Home

Web Summary : Make quick, healthy Rava Uttapam in minutes! This simple recipe uses readily available ingredients. Enjoy soft, delicious Uttapam with chutney or sambar.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स