हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बरेचदा मस्त गरमागरम, वाफाळता, मऊ - मोकळा असा पांढराशुभ्र 'जिरा राईस' मागवतो. हॉटेलमध्ये विकत मिळणाऱ्या त्या जिरा राईसचा सुगंध, पांढराशुभ्र रंग आणि मुख्य म्हणजे प्रत्येक दाणा मोकळा, लांबसडक आणि लोण्यासारखा मऊ असलेला भात पाहिला की भूक दुपटीने वाढते. असाच हॉटेलसारखा जिरा राईस घरच्याघरी तयार करतो तेव्हा बरेचदा बेत फसतो. घरी केलेला जिरा राईस चिकट होतो किंवा प्रत्येक दाणा मोकळा होत नाही इतकंच नाही तर हॉटेल सारखी खमंग अशी चवही येत नाही... पण आता काळजी करू नका! हॉटेल स्टाईल परफेक्ट जिरा राईस घरीच तयार करणे फारसे कठीण नाही. फक्त तांदूळ निवडण्यापासून शिजवण्याच्या पद्धतीपर्यंत काही छोट्या पण महत्त्वाच्या 'सिक्रेट टिप्स' फॉलो केल्या, तर आपणही घरच्याघरीच सुटसुटीत आणि चविष्ट जिरा राईस तयार करू शकतो(Easy Restaurant Style Jeera Rice Recipe).
योग्य तांदूळाची निवड, पाण्याचे प्रमाण आणि काही खास किचन टिप्स माहीत असतील तर अगदी हॉटेल स्टाईल मऊ, प्रत्येक दाणा वेगळा दिसणारा जिरा राईस घरीही सहज करता येतो. छोट्या-छोट्या चुका टाळून आणि योग्य पद्धतीने शिजवल्यास जिरा राईसचा रंग, सुगंध आणि चव तिन्ही परफेक्ट येतात. अगदी हॉटेल सारखाच 'जिरा राईस' घरच्याघरीच (How To Make Perfect Jeera Rice) तयार करण्यासाठी खास टिप्स पाहूयात.
घरच्याघरीच हॉटेल सारखा 'जिरा राईस' का होत नाही ?
अनेकदा आपण तांदूळ न भिजवता थेट कुकरला लावतो, ज्यामुळे भात हवा तसा मोकळा होत नाही. पाण्याचा अंदाज चुकला तरी भात एकतर कच्चा राहतो किंवा खूप चिकट होतो. कुकरची शिट्टी झाल्यावर लगेच प्रेशर (वाफ) काढून टाकणे ही एक मोठी चूक आहे. भाताचे दाणे वाफेमध्ये आपोआप सेट होतात, त्यामुळे कुकर स्वतःहून थंड होऊ देणे गरजेचे असते. जर तुम्ही घाईत लगेच झाकण उघडले, तर भाताचे दाणे आतून कच्चे राहू शकतात किंवा ते तुटू शकतात.
शिळ्या चपातीची वडी! कुरकुरीत मसालेदार वडी पाहून सगळे विचारतील रेसिपी, शिळ्या पोळ्यांचा चट्टामट्टा...
हॉटेल स्टाईल मऊ - मोकळा, पांढराशुभ्र 'जिरा राईस' करण्यासाठी...
१. तांदूळ धुण्याची योग्य पद्धत :- तांदूळ शिजवण्यापूर्वी ते किमान २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने तांदळावर साचलेला अतिरिक्त 'स्टार्च' निघून जाण्यास मदत होते. हा स्टार्च तांदळात राहिला तरच भात शिजल्यानंतर एकमेकांना चिकटतो किंवा जास्त ओला गिळगिळीत होतो.
२. तांदूळ भिजवण्याचे महत्त्व :- तांदूळ धुतल्यानंतर ते लगेच कुकरमध्ये टाकू नयेत. धुतलेले तांदूळ किमान १५ मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवावेत. भिजवल्यामुळे तांदळाचे दाणे पाणी व्यवस्थित शोषून घेतात. पाणी शोषल्यामुळे तांदूळ शिजताना आपल्या पूर्ण लांबीपर्यंत व्यवस्थित वाढू शकतात. या पद्धतीमुळे भात मऊ होतो आणि त्याचे दाणे एकमेकांना न चिकटता अगदी मोकळे आणि सुटसुटीत होतात.
३. परफेक्ट चवीसाठी 'देसी तूप' आणि 'जिऱ्याची' फोडणी :- रेस्टॉरंटसारखी अस्सल चव हवी असेल, तर तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करा. कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे टाका. तुपाचा सुगंध आणि जिऱ्याची फोडणी भाताची चव अनेक पटींनी वाढवते. तूप केवळ चवच वाढवत नाही, तर ते तांदळाच्या दाण्यांभोवती एक गुळगुळीत आणि तेलकट थर तयार करते. या थरामुळे भाताचे दाणे शिजल्यानंतर एकमेकांना चिकटत नाहीत आणि मोकळे राहतात.
४. पाण्याचे अचूक प्रमाण :- अनेकदा आपण पाणी घालताना अंदाज चुकवतो, ज्यामुळे भात बिघडतो. कुकरमध्ये तांदूळ आणि पाणी घातल्यानंतर पाण्याचे प्रमाण इतकेच असावे की तांदूळ त्यामध्ये फक्त बुडतील. म्हणजेच, तांदूळ आणि पाण्याचे प्रमाण साधारणपणे एकसमान असावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातल्यास भात चिकट आणि गिळगिळीत होतो. याउलट, पाणी खूप कमी पडल्यास भाताचे दाणे कडक किंवा कच्चे राहतात.
५. कुकरमध्ये भात शिजवण्याची योग्य पद्धत :- तांदूळ कुकरमध्ये ओतल्यानंतर कुकरचे झाकण बंद करा आणि मोठ्या आचेवर (High Flame) २ शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवा. मोठी आच ठेवल्यामुळे कुकरमध्ये प्रेशर लवकर तयार होते, ज्यामुळे तांदळाचे दाणे तुटत नाहीत. दोन शिट्ट्या झाल्यानंतर लगेच गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर कुकरचे प्रेशर किंवा वाफ स्वतःहून पूर्णपणे निघून जाऊ द्या. कुकरमधील वाफ पूर्णपणे निघाल्यावर जेव्हा तुम्ही झाकण उघडाल, तेव्हा तुम्हाला हॉटेलसारखा मोकळा आणि सुटसुटीत भात तयार मिळेल.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. भात शिजवताना मोठ्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये योग्य प्रमाणांत पाणी उकळवा. पाणी उकळायला लागल्यावर मीठ, तूप/तेल आणि चमचाभर लिंबाचा रस किंवा दही घाला. हीच खास युक्ती भाताचे दाणे वेगळे ठेवते आणि रंग छान येतो.
२. एक दाणा काढून बोटाने दाबा. बाहेरून मऊ आणि आत थोडासा कच्चेपणा असेल तेव्हाच भात गाळून घ्या. जास्त शिजवला तर भात फुटतो. गाळलेला भात ५ मिनिटं मोकळा पसरून ठेवा. लगेच झाकण ठेवलं तर वाफेमुळे भात चिकटतो.
3. कुकरमध्ये भात शिजवताना मोठ्या आचेवर २ शिट्ट्या कराव्यात, जेणेकरून प्रेशरमुळे दाणे तुटत नाहीत.
४. कुकरची शिट्टी झाल्यावर प्रेशर स्वतःहून निघू द्या, लगेच झाकण उघडल्यास वाफ निघून गेल्याने भात आतून कच्चा राहू शकतो.
