पाव हा पदार्थ अधून मधून हा होईना प्रत्येकाच्याच घरी खाल्ला जातो. कधी पाव भाजी, कधी भजी पाव कधी मिसळ पाव तर कधी भूर्जी पाव (Cooking Hacks). पावासोबत बरेच पदार्थ खाल्ले जातात. नेहमी नेहमी बाहेरून पाव खाणण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी बेकरी स्टाईलचे पाव बनवू शकता. पाव घरी करणं एकदम सोपं आहे. बेकरीस्टाईलचे पाव कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूया. अनेकदा बाहेरचे पाव फ्रेश नसतात, शिळे पाव खाल्ल्यानं पोटाचे विकारही उद्भवतात. घरच्याघरी पाव करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहा. (How To Make Fresh Pav At Home)
यीस्ट ऍक्टिव्हेट करणे: एका वाटीत कोमट दूध किंवा पाणी घ्या. पाणी/दूध कोमट असावे, गरम नाही. त्यात साखर आणि ड्राय यीस्ट घाला. व्यवस्थित मिसळून 10 मिनिटे झाकून ठेवा. यीस्ट फुलून त्यावर फेस दिसल्यास, यीस्ट पाव बनवण्यासाठी तयार आहे.
कणिक मळणे : एका मोठ्या भांड्यात मैदा आणि मीठ घ्या. त्यात ऍक्टिव्हेट झालेले यीस्टचे मिश्रण घाला. आवश्यकतेनुसार कोमट पाणी/दूध घालत कणिक मळा. कणिक एकत्र झाल्यावर त्यात बटर किंवा तेल घालून कमीत कमी 10 ते 12 मिनिटे चांगली मळून घ्या. कणिक लवचिक (Stretchy) आणि मऊ झाली पाहिजे. मळण्यात केलेली मेहनत पावाला मऊ करते.
फर्मेंटेशन : मळलेली कणिक तेलाचा हात लावलेल्या भांड्यात ठेवा. त्यावर झाकण ठेवून 1 ते 1.5 तास उबदार जागी फुलवून ठेवा. कणिक दुप्पट झाली की ती तयार आहे.
पाव तयार करणे: फुललेली कणिक हलक्या हाताने दाबून त्यातील हवा काढून टाका. कणकेचे समान आकाराचे छोटे गोळे करून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये किंवा कढई/कुकरमध्ये ठेवायच्या भांड्यात एकमेकांना चिकटून थोडं अंतर ठेवून ठेवा.
दुसरे फर्मेंटेशन : हे गोळे पुन्हा 30 ते 40 मिनिटे झाकून उबदार जागी फुलवून घ्या. गोळे पुन्हा दुप्पट झाल्यावर बेक करण्यासाठी तयार होतील.
बेक करणे: ओव्हनमध्ये 180°C वर 20 ते 25 मिनिटे किंवा पाव सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत बेक करा. ओव्हन नसेल तर जाड तळाच्या कढईत मीठ टाकून प्री हीट करून, झाकण ठेवून मंद आचेवर बेक करू शकता.
फिनिशिंग: पाव बेक झाल्यानंतर लगेच गरम असताना त्यावर वितळलेले बटर (Butter) लावा. यामुळे पावाला बेकरीसारखी चमक आणि मऊपणा येतो. 10 मिनिटांनी पाव थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा आणि गरमागरम पावभाजी किंवा वडापावचा आनंद घ्या!
