कुरमुऱ्यांचे लाडू हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारीक पदार्थ आहे. थंडीच्या दिवसांत किंवा संक्रांतीला हे लाडू घरोघरी बनवले जातात. हे लाडू चवीला गोड आणि खायला अतिशय कुरकुरीत असतात. कुरमुऱ्यांचे लाडू करणं अत्यंत सोपं आहे ही रेसिपी झटपट तयार होते. (Kurmura Ladoo Recipe).
गुळाचा वापर केल्यामुळे हे लाडू आरोग्यासाठी पौष्टीक ठरतात आणि लहान मुलांसाठी हा एक उत्तम घरगुती खाऊ आहे. कमीत कमी साहित्यात आणि अत्यंत कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ प्रवासात नेण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यावर खाण्यासाठी १ उत्तम पर्याय आहे. (How To Make Murmura Ladoo At Home)
हे लाडू करण्याासठी सर्वात आधी ३ वाटी कुरमुरे लाडू मंद आचेवर कढईत थोडे भाजून घ्या. ज्यामुळे ते अधिक कुरकुरीत होतील. त्यानंतर एका कढईत १ चमचा तूप आणि १ वाटी चिरलेला गूळ घेऊन त्यात थोडं पाणी घालून पाक तयार करा. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्याला फेस येऊ लागतो. अशावेळी पाकाचा थेंब पाण्यात टाकून पाहा. जर त्याची कडक गोळी झाली तर पाक तयार झाला असं समजावे.
आता गॅस बंद करून या पाकात भाजलेले कुरमुरे आणि थोडी वेलची पूड घालून सर्व मिश्रण झटपट एकजीव करून घ्या. मिश्रण गरम असतानाच हाताला थोडं पाणी किंवा तूप लावून मध्यम आकाराचे गोल लाडू वळून घ्या. हे लाडू पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून घ्या. हे लाडू अनेक दिवस चांगले राहतात.
कुरमुर्यांचा लाडू बिघडू नये यासाठी काय करावं?
लाडू वळण्यापूर्वी कुरमुरे नेहमी मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत. जरी कुरमुरे ताजे वाटत असले तरी भाजल्यामुळे त्यातील ओलावा निघून जातो आणि लाडू दीर्घकाळ कुरकुरीत राहतात. लाडू बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे गुळाचा पाक. पाकाचा थेंड थंड पाण्यात घातल्यावर त्याची गोळी सहज हातानं करता आली पाहिजे आणि ती गोळी वाटीवर आपटल्यावर टण असा आवाज आला पाहिजे. जर गोळी रबरासारखी ओढली जात असेल तर लाडू चिकट होतील.
