नेहमी नेहमी चपाती, भाकरी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरचे अन्हेल्दी पदार्थ न खाता तुम्ही घरच्याघरी काहीतरी पौष्टीक पदार्थ बनवू शकता. ज्यामुळे तुमच्या आहारात बदल होईल आणि काहीतरी हेल्दी पदार्थ खाल्ल्याचंही फिलिंग येईल. (How To Make Jawar Dosa Jawar Chilla)
ज्वारी हे अत्यंत पौष्टीक आणि पचायला हलकं असं तृणधान्य आहे. बरेचजण आपल्या रोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करतात. जर तुम्हाला भाकरी आवडत नसतील तर सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ज्वारीच्या पिठाचे धिरडे हा उत्तम पर्याय आहे. हे धिरडे चवीला जितके छान लागतात तितकेच ते करायलाही सोपे असतात. ज्यांना ग्लुटेन फ्री आहार घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी हा पदार्थ वरदान ठरतो. (Jawar Chilla Recipe)
ज्वारीचे धिरडे करण्यासाठी काय साहित्य लागतं?
ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी प्रामुख्यानं दोन वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट, जीरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडं दही किंवा ताक लागते.
ज्वारीचे धिरड करण्याची सोपी सेरिपी
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ घेऊन त्यात पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीनं मध्यम स्वरूपात मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ नसावे. आता त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, ओवा, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. पीठ भिजवल्यानंतर १०-१५ मिनिटे तसेच ठेवल्यास धिरडे छान मऊ होतात.
त्यानंतर, गॅसवर नॉन-स्टिक तवा किंवा लोखंडी तवा गरम करायला ठेवा. तव्याला थोडे तेल लावून त्यावर तयार मिश्रण पळीने मधोमध टाकावे आणि गोलाकार पसरवावे. धिरड्याच्या कडेने थोडे तेल सोडावे आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. धिरडे छान जाळीदार व्हावे यासाठी मिश्रणात थोडे ताक घातल्यास उत्तम. हे गरमागरम धिरडे शेंगदाण्याची चटणी, दही किंवा सॉससोबत अप्रतिम लागतात. कमीत कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
