दिवाळीत गोड-धोड खाऊन कंटाळा आला असेल आणि नाश्त्याला काहीतरी पौष्टीक, चमचमीत करायचा विचार करत असाल तर साधी सोपी रेसिपी ट्राय करू शकता (Rava Appe Recipe). वाटीभर रव्याचा वापर करून तुम्ही इंस्टंट अप्पे बनवू शकता. अप्पे चवदार, चमचमीत लागतात तसंच हा नाश्ता करायला वेळही कमी लागतो. रव्याचे अप्पे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. सकाळच्या नाश्त्याला नारळाच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचअपसोबत तुम्ही अप्पे खाऊ शकता. (How To Make Instant Rava Appe)
रव्याचे अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य (Instant Rava Appe Recipe)
बारीक रवा - १ वाटी
ताक किंवा दही - अर्धी वाटी (आवश्यकतेनुसार कमी-जास्त)
कांदा - १ छोटा (बारीक चिरलेला)
गाजर - १/२ (बारीक किसलेला किंवा चिरलेला)
टोमॅटो - १ छोटा (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची - १ ते २ (बारीक चिरलेली, तिखटानुसार)
आले - १/२ इंच (किसून किंवा पेस्ट)
कोथिंबीर - २ चमचे (बारीक चिरलेली)
मीठ - चवीनुसार
इनो किंवा खाण्याचा सोडा - १ छोटा चमचा
तेल - आप्पे पात्र ग्रीस करण्यासाठी
रवा अप्पे करण्याची सोपी रेसिपी
एका मोठ्या भांड्यात रवा घ्या. त्यात ताक किंवा दही आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा खूप पातळ नसावे. इडलीच्या पिठासारखी consistency ठेवा. हे मिश्रण किमान १५ ते २० मिनिटे बाजूला झाकून ठेवा, जेणेकरून रवा फुगेल आणि मऊ होईल.
१५-२० मिनिटांनी, फुगलेल्या रव्याच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि कोथिंबीर घाला. हे सर्व पुन्हा एकदा नीट मिक्स करा. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर थोडे पाणी किंवा ताक मिसळून योग्य कंसिंटंसी मध्ये आणा. अप्पे बनवण्यापूर्वी लगेच, मिश्रणात इनो किंवा खाण्याचा सोडा घाला.
इनो घातल्यावर त्यावर एक चमचा पाणी घाला आणि मिश्रण हलक्या हाताने एकाच दिशेने पटकन मिसळा. जास्त वेळ फेटू नका, नाहीतर हवा निघून जाईल. यामुळे आप्पे टम्म फुगतात आणि मऊ होतात. आप्पे पात्र गॅसवर मध्यम आचेवर गरम करा.
प्रत्येक खाच्यात थोडे तेल साधारण २-३ थेंब घाला. तयार केलेले मिश्रण प्रत्येक खाच्यात चमच्याने भरा. ते खूप ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घ्या. पात्रावर झाकण ठेवून मध्यम-मंद आचेवर २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
२-३ मिनिटांनी झाकण काढून पाहा. आप्पे एका बाजूने सोनेरी झाले असतील. छोट्या चमच्याच्या किंवा काटा चमच्याच्या मदतीने आप्पे हळूवारपणे पलटा. दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून २ मिनिटे सोनेरी होईपर्यंत शिजू द्या.
आप्पे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजल्यावर आणि सोनेरी झाल्यावर काढून घ्या. गरमागरम रवा आप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
