'साजूक तूप' हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आजही कित्येक घरांमध्ये साजूक तूप बाहेरून विकत न आणता घरच्याघरीच तयार केले जाते. घरी ताजे, शुद्ध आणि दाणेदार तूप तयार करण्याची प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ असते. दुधावरील साय साठवण्यापासून ते साजूक तूप तयार करण्यापर्यंत बरीच मेहेनत घ्यावी लागते. साजूक तूप तयार करण्यासाठी वेळ आणि संयम लागतो म्हणून अनेकजणी कंटाळा करतात. परंतु आपण आपल्या नेहमीच्या प्रेशर कुकरमध्ये देखील अतिशय कमी वेळात तितकेच दाणेदार आणि रवाळ तूप झटपट करु शकतो. या पद्धतीने तूप तयार केल्यास त्याचा रंग, चव आणि सुगंध दोन्हीही अप्रतिम लागतात(how to make ghee in pressure cooker).
साजूक तूप कढवताना, ते सतत ढवळत राहावे लागते आणि भांडे जळण्याची भीतीही असते अशा एक ना अनेक गोष्टींचे टेंन्शन असते. यासाठीच, आपण 'प्रेशर कुकर' वापरून फक्त १५ ते २० मिनिटांत शुद्ध आणि दाणेदार साजूक तूप तयार करू शकता. प्रेशर कुकर वापरुन साजूक तूप तयार करण्याची ही ट्रिक, स्वयंपाकाचा वेळ वाचवते आणि या पद्धतीमुळे तूप अगदी परफेक्ट, सुगंधित होते. फक्त ४ सोप्या स्टेप्समध्ये प्रेशर कुकरचा वापर करून 'दाणेदार' साजूक तूप कसे तयार करायचे (homemade ghee using pressure cooker) याची सोपी ट्रिक पाहूयात...
प्रेशर कुकरमध्ये साजूक तूप तयार करण्याची झटपट ट्रिक...
स्टेप १ :- साय/लोणी कुकरमध्ये घाला :- जमा केलेली साय (जी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असेल) किंवा लोणी एका मध्यम आकाराच्या प्रेशर कुकरमध्ये ओता. जर साय फार कोरडी नसेल, तर पाणी घालण्याची गरज नाही. साय खूप घट्ट किंवा कोरडी असल्यास अर्धा कप पाणी कुकरमध्ये घाला, आणि चिमूटभर बेकिंग सोडा देखील घालू शकता यामुळे तूप छान घट्टसर आणि लवकर तयार होते.
स्टेप २ :- कुकर बंद करून शिट्टी होऊ द्या :- कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करुन घ्या. कुकरची पहिली शिट्टी झाल्यावर गॅस लगेच बंद करा. कुकरमधील हवा आपोआप पूर्णपणे निघून जाईपर्यंत थांबा.
स्टेप ३ :- तूप शिजवा आणि साय बाजूला काढा :- कुकरचे झाकण उघडा. तुम्हाला दिसेल की, आता वर साजूक तूप वेगळे झालेले दिसेल. गॅस पुन्हा मंद आचेवर ठेवून तूप आणखी २ ते ५ मिनिटे शिजवा. या स्टेपमध्ये तुपाला त्याचा नैसर्गिक दाणेदार टेक्श्चर मिळते.
स्टेप ४ :- तूप गाळून व्यवस्थित स्टोअर करा :- गॅस बंद करा. तूप कोमट झाल्यावर एका स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात गाळून घ्या. गाळण्यासाठी बारीक जाळी असलेली गाळणी किंवा सुती कापड वापरा. गाळून घेतलेलं तूप हवाबंद बरणीत स्टोअर करून ठेवा.
या सोप्या स्टेप्सचा वापर करून तुम्हीही घरच्याघरी अत्यंत कमी वेळेत आणि सहजपणे शुद्ध, सुवासिक आणि दाणेदार साजूक तूप तयार करू शकता!