दिवाळी म्हटलं की फराळ आलाच...फराळाच्या ताटात सगळे पदार्थ असतील तरच खायला मजा येते... पण तेच जर फराळाच्या ताटात चकली नसेल तर काय मजा.. चकली म्हटलं की डोळ्यासमोर येते ती भाजणीची तयारी, गिरणीच्या वाऱ्या आणि मग पीठ मळून चकल्या पाडण्याची मेहेनत, अनेकदा वेळ कमी (How To Make Butter Chakli) असल्यामुळे किंवा भाजणीची एवढी मोठी तयारी टाळण्यासाठी, अनेकजणी चकली करायला नकोच म्हणतात. पारंपरिक भाजणीची चकली तयार करणं म्हणजे थोडं वेळखाऊ आणि कष्टाचं काम असतं. या दिवाळीत जर पण भाजणीच्या चकली शिवाय, अगदी झटपट होणारी आणि तोंडांत टाकताच विरघळणारी 'बटर चकली' करु शकतो(Butter Chakli Recipe).
बटर चकली खमंग आणि कुरकुरीत असते, इतकंच नाही तर ती कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट तयार होते. या चकलीची चव इतकी लाजवाब असते की, ती एकदा खाल्यावर भाजणीची चकली विसरून जाल! बटर चकली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सोपी कृती आणि ती अधिक खुसखुशीत होण्यासाठीच्या खास टिप्स पाहूयात. यंदाच्या दिवाळीत फारशी मेहेनत न घेता चवीला अप्रतिम असलेली बटर चकली नक्की करून पाहा!
साहित्य :-
१. पाणी - १ कप
२. बटर - १ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. कलोंजी - १/२ टेबलस्पून
५. ओवा - १/२ टेबलस्पून
६. तांदुळाचे पीठ - १ कप
७. तेल - तळण्यासाठी
सिक्रेट टीप :-
१. बटर चकली करताना तांदुळाच्या पिठात थोडा बेकिंग सोडा, बेसन तसेच चिमूटभर हिंग घातल्यास चकली अधिक कुरकुरीत आणि चविष्ट होते.
२. तांदुळाचे पीठ भिजवण्यासाठी पाण्याऐवजी ताज्या ताकाचा देखील वापर करु शकता. ताकात पीठ भिजवल्याने चकली चवीला अप्रतिम लागते.
कृती :-
१. एका भांडयात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम पाण्यात बटर, चवीनुसार मीठ, कलोंजी, ओवा घालावा.
२. हलकीशी एक उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात तांदुळाचे पीठ घालून ते कालवून घ्यावे.
३. पीठ कालवून एकजीव करुन घेतल्यावर गॅस बंद करून वर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून द्यावे.
चिवडा मऊ पडतो, सादळतो? ७ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...
४. मग हे झाकून ठेवलेले पीठ एका परातीत काढून ते व्यवस्थित हाताने दाब देत मळून घ्यावे.
५. मळून तयार केलेलं पीठ चकलीच्या साच्यात भरुन चकल्या पाडून घ्याव्यात.
६. आता कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करा, गरम तेलात चकल्या सोडून हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
तांदुळाच्या पिठाची फक्त १५ मिनिटांत तयार होणारी मस्त कुरकुरीत, क्रिस्पी चकली खाण्यासाठी तयार आहे.