ऋतू कोणताही असो कुरकुरीत बटाटा वडा (Batata Vada) खाण्याची मजा काही वेगळीच असते. गाडीवर मिळणारे गरमागरम वडापाव प्रत्येकाच खायला आवडतात. बटाटे वडे घरी करायचं म्हटलं तर परफेक्ट जमत नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे बटाटे वडे करण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.(How To Make Batata Vada At Home)
बटाटे वडे करण्याची खास कृती
सगळ्यात आधी उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, हळद घालून फोडणी तयार करून घ्या. या फोडणीत हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालून परतवून घ्या. त्यानंतर कुस्करलेले केलेले बटाटे, चवीनुसार मीठ आणि भरपूर ताजी कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या. उत्तम बटाटा वड्यासाठी ही स्टेप खूपच महत्वाची आहे. हे सारण थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून ठेवा. (Batata Vada Recipe)
वड्यांचे बाहेरचे आवरण तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये हरभरा डाळीचे पीठ घ्या. त्यात थोडी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा घाला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवा. पिठाची सुसंगता खूपच घट्ट किंवा पातळ नसावी. ती बटाट्याच्या गोळ्याला व्यवस्थित चिकटेल अशी मध्यम असावी. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
आता तळण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कढईत पुरेसं तेल चांगलं गरम करून घ्या. तयार केलेले बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात नीट घोळवून घ्या. जेणेकरून पिठाचा थर सर्व बाजूंनी व्यवस्थित बसेल त्यानंतर हे वडे सावधगिरीनं गरम तेलात सोडा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दोन्ही बाजून पिवळसर, सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्या. वडे तळताना ते मधेच उलटत राहावेत जेणेकरून सर्व बाजूंना समान शिजतील.
तयार झालेले गरमागरम बटाटे वडे तळलेल्या हिरव्या मिरच्या, ओल्या खोबर्याची चटणी किंवा लसणाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. जर तुम्हाला वडा पाव खायचा असेल तर पावाला थोडी चटणी लावून यामध्ये हा वडा ठेवून त्याचा आस्वाद घेता येईल. घरच्याघरी केलेला हा बटाटा वडा हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि पौष्टीक लागतो.
