थंडीच्या दिवसांत हवेतील ओलावा आणि तापमान कमी असल्यामुळे डोश्याचं पीठ व्यवस्थित आंबत नाही. कमी उष्णता मिळाल्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. पण विकत मिळतात तसे डोसे घरी करणं एकदम सोपं आहे. थंडीच्या दिवसांतही तुम्ही परफेक्ट आंबवलेलं पीठ तयार करू शकता आणि डोसेसुद्धा तव्याला न चिकटता परफेक्ट कुरकुरीत होतील. त्यासाठी काही सोप्या कुकींग टिप्स पाहूया. (How To Ferment Dosa Batter At Home)
साहित्य भिजवताना आणि वाटताना ही ट्रिक वापरा
थंडीच्या दिवसांत पीठ तयार करताना कोमट पाण्याचा वापर करा ज्यामुळे बरेच फायदे मिळतात. डाळ-तांदूळ भिजवताना त्यात थोडे मेथी दाणे आवर्जून घाला. मेथीमुळे आंबवण्याची प्रक्रिया वेगानं होते. पीठ वाटताना ते जास्त घट्ट ठेवू नका. कारण घट्ट पीठ लवकर फुगत नाही.
पीठ वाटून झाल्यावर त्यात अर्धा चमचा साखर किंवा थोडे पोहे भिजवून वाटून घातल्यास डोश्याला छान सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणा येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पिठात लगेचच मीठ घालू नका. मीठ आंबवण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पीठ फुगल्यानंतर किंवा डोसे काढण्यापूर्वीच मीठ घाला.
पीठ फुगवण्याची वॉर्म पद्धती
थंडीत पीठ उबदार जागी ठेवणं अनिवार्य आहे. तुम्ही पिठाचे भांडे एका जाड स्वेटरमध्ये किंवा लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवू शकता. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन ५ मिनिटं गरम करून बंद करा आणि त्या उबदार ओव्हनमध्ये पिठाचे भांडे रात्रभर ठेवा.
पिठाच्या भांड्याखाली एखादं गरम कापड किंवा लाकडी फळी ठेवल्यानं जमिनीची थंडी पिठापर्यंत पोहोचत नाही. जर पीठ अजिबातच फुगत नसेल तर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि इनो वापरणं हा शेवटचा पर्याय असू शकतो.
कुरकुरीत डोसा करण्याचे तंत्र
डोसा करताना तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्यावर थोडं पाणी शिंपडून तो सुती कापडानं पुसून घ्या. ज्यामुळे तव्याचे तापमान नियंत्रणात राहते. डोसा पसरवल्यानंतर त्यावर कडेनं थोडं लोणी किंवा तेल सोडा. डोसा मध्यम आचेवर भाजला पाहिजे तरच तो कुरकुरीत होतो. या टिप्सचा वापर केल्यास थंडीच्या दिवसातचं डोसा कुरकुरीत, खमंग होईल.
