नाचणी हे एक आरोग्यवर्धक धान्य आहे. त्यामुळे हल्ली नाचणीची भाकरी किंवा पोळी खायला हवी असं आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. नाचणीमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह तसेच इतर खनिजे मिळतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खायलाच हवी. पण बऱ्याच जणांची ही अडचण आहे की नाचणीची भाकरी त्यांना व्यवस्थित करता येत नाही. ती खूप कडक होते. त्यामुळे ती अजिबातच खावी वाटत नाही (how to do ragi roti?). तुमचंही असंच होत असेल तर नाचणीची भाकरी करण्याची संजीव कपूर यांनी सांगितलेली रेसिपी एकदा बघा.(Ragi Roti Recipe by Sanjeev Kapoor)
नाचणीची भाकरी कडक होऊ नये म्हणून काय करावे?
याविषयीचा एक व्हिडिओ संजीव कपूर यांनी शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी करण्याची रेसिपी जवळपास सारखीच आहे.
नाचणीची भाकरी करण्यासाठी सगळ्यात आधी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये पाणी घाला. पाण्यात चमचाभर तूप आणि थोडं मीठ घाला. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू नाचणीचं पीठ घाला.
एका हाताने कढईमधलं मिश्रण हलवत राहा. जेव्हा कढईमधल्या पाण्यात पीठ जास्त बसणार नाही असं लक्षात येईल तेव्हा पीठ घालणं बंद करा आणि कढईवर एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा.
आता कढईमधलं पीठ थंड झाल्यानंतर ते एका पसरट भांड्यात काढा आणि हाताला थोडंसं तूप लावून कणिक मळतो त्याप्रमाणे नाचणीचं पीठ मळून घ्या.
यानंतर त्या पिठाचे चपात्या करण्यासाठी करतो त्या पद्धतीचे गोळे करा आणि पीठ लावून भाकरी थापून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या. अशा पद्धतीने केलेली नाचणीची भाकरी अतिशय मऊसूत आणि खमंग होते.



