Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम पालक सूप, चविष्ट व्हेज सूप थंडीत अजून प्यायलाच नाहीत? सोपी रेसिपी, घशाला आराम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:00 IST

झटपट होणारे हेल्दी सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल, हेल्दी भी..टेस्टी भी

ठळक मुद्देथंडीत मधल्या वेळेला प्या गरमागरम सूपट्राय करा सोप्या आणि चविष्ट रेसिपी

छायाचित्रे - इंडियन हेल्दी रेसिपी, फर्स्ट क्राय 

ख्रिसमस आणि इयर एंड जसे जवळ येतंय तसा थंडीचा कडाका वाढत चाललाय. कुडकुडवणाऱ्या थंडीत हातात गरमागरम सूपचा बाऊल असेल तर? कल्पना करुनही किती छान वाटतं ना? सध्या बाजारात भरपूर भाज्याही उपलब्ध आहेत. अशा या ताज्या भाज्यांचे मस्त सूप करुन प्यायले तर, घशाला तर आराम मिळेलच पण यामुळे थंडीही पळून जाईल. त्यातही भाज्यांचे सूप असल्याने तब्येतीसीठीही त्याचा फायदा होईल. मग नाष्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळात, जेवणाच्या काही वेळ आधी किंवा संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळेला हे सूप प्यायले तर भूकही भागते. म्हणूनच आरोग्यासाठी फायदेशीर असणारे व्हेज सूप आणि पालक सूप तुम्ही अजून घरी ट्राय केले नसेल तर नक्की ट्राय करा....पाहूया कमीत कमी पदार्थांमध्ये होणारी सोपी रेसिपी...

व्हेज सूप 

साहित्य - 

फ्लॉवर - एक वाटी चिरलेला 

मटार - अर्धी वाटी

गाजर - अर्धी वाटी उभे चिरलेले 

फरसबी - अर्धी वाटी चिरलेली

कोथिंबीर - अर्धी वाटी चिरलेली 

आलं - लसूण पेस्ट - एक चमचा 

मिरपूड - पाव चमचा 

मीठ - चवीनुसार 

तूप - अर्धा चमचा 

(Image : Google)

कृती 

१. सगळ्या भाज्या धुवून, चिरुन पाणी घालून उकडून घ्या. कुकरला उकडणार असाल तर दोनच शिट्ट्या करा. जास्त शिजल्या तर त्याचा लगदा होतो. या भाज्या थेट गॅसवर पातेल्यातही पटकन शिजतात.

२. शिजवून झाल्यावर अर्ध्या भाज्या आणि शिजवलेले पाणी तसेच ठेवा आणि यातील अर्ध्या भाज्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

३. कढईत अर्धा चमचा तूप घाला. यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून या दोन्ही गोष्टी कढईत घाला.

४. जास्त घट्ट वाटत असल्यास वरुन थोडे पाणी घाला. 

५. मीठ, मीरपूड घालून एकसारखे हलवा. 

६. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकता, मात्र लिंबू पिळल्यास थोडीशी साखर घातल्यास चव येते. 

७. घरात उपलब्ध असतील अशा कोबी, शिमला मिरची यांसारख्या भाज्याही तुम्ही या व्हेज सूपमध्ये घालू शकता. 

८. सूप बाऊलमध्ये घेऊन त्यावर हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घाला आणि प्यायला घ्या.

 

पालक सूप 

पालकाचे आरोग्यासाठी असणारे विविध फायदे आपल्याला माहित आहेत. लोह, खनिजे, कॅल्शियम यांनी युक्त असलेला पालक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच अतिशय फायदेशीर असतो. लठ्ठपणा कमी करण्यापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी पालकाचा उपयोग होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आहारात पालकाचा समावेश असायलाच हवा. सतत पालकाची भाजी किंवा पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर पालक सूप हा उत्तम उपाय आहे. पाहूयात पालक सूप कसे करायचे 

साहित्य - 

पालक - ३० मध्यम आकाराची पाने चिरलेली 

कांदा - १ मध्यम आकाराचा चिरलेला 

काळी मिरी- ५ ते ६ 

दूध - एक कप

मीठ - चवीनुसार 

तमालपत्र - २ पाने 

तेल - एक चमचा 

लसूण - ५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेल्या 

(Image : Google)

कृती 

१. कढईत तेल घेऊन त्यात काळी मिरी, लसूण पेस्ट, तमालपत्र आणि कांदा परतून घ्यावा.

२. कांद्याला सोनेरी रंग आल्यावर त्यामध्ये पालकाची पाने घालून मीठ घालावे.

३. यामध्ये अंदाजे पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यावे. जास्त शिजल्यास पालकाचा रंग बदलतो. त्यामुळे हिरवा रंग राहील इतकेच शिजवावे.

४. शिजल्यावर हे मिश्रण गार करा. यातून तमालपत्र बाहेर काढा

५. यातील घट्ट गोष्टी मिक्सरमधून बारीक करुन घ्या, पालकाचे पाणी बाजूला ठेवा.

६. बारीक केलेले मिश्रण कढई गॅसवर ठेऊन त्यामध्ये घ्या. त्यात बाजूला काढलेले पाणी अंदाजे घाला. 

७. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि आवडीनुसार क्रिम किंवा तूप घालून सूप प्यायला घ्या. 

 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य