सांबार हा फार लोकप्रिय प्रकार आहे. इडली, डोसासोबत सांबार खातातच मात्र सांबार भातही मस्त लागतो. सांबार करणे अनेकांना कठीण वाटते मात्र मुळात तो सोपाच असतो. सांबर करण्याच्या अनेक रेसिपी आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालक सांबार. (Hot spinach sambar - rice and ghee is filling and tasty combo, see the easy recipe)ही रेसिपी अगदी सोपी आणि चविष्ट आहे. एकदा पालक सांबार आणि भात खाऊन पाहा नक्की आवडेल.
साहित्य
पालक, तूरडाळ, मसुरडाळ, टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची, हळद, सांबार मसाला, मीठ, लाल तिखट, तूप, मोहरी, जिरे, कडीपत्ता, काश्मीरी लाल मिरची, चिंच, गूळ
कृती
१. पालकाची छान ताजी जुडी निवडायची. पानं गरम मीठ पाण्यात बुडवायची. १५ मिनिटांत पालक छान स्वच्छ होतो. समप्रमाणात तुरडाळ आणि मसुरडाळ घ्या. दोन ते तीन वेळा धुवा. कांदा सोला आणि बारीक चिरुन घ्या. टोमॅटोही छान बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या.
२. चिंच गरम पाण्यात भिजवायची. हाताने कुस्करुन त्याचा कोळ तयार करायचा. चोथा काढून रस वेगळा करायचा. गाळून घ्या. गूळ किसून घ्यायचा.
३. एका कुकरमध्ये थोडे तूप घाला. त्यावर व्यवस्थित चिरलेला पालक घाला. चमचाभर हळद घाला. तसेच तुरडाळ आणि मसुरडाळ घालायची. कांदाही घाला. तसेच चिरलेला टोमॅटो घालून त्यात किसलेला गूळ घाला. अगदी चवीपुरताच घालायचा. चिचंचे पाणी घाला. चमचाभर लाल तिखट आणि आवडीनुसार सांबार मसाला घाला. त्यात लसणाच्या पाकळ्याही घाला. पाणी घाला आणि कुकर लावा. शिटी काढून घ्यायची. मस्त सांबार तयार होईल.
४. एका फोडणीपात्रात चमचाभर तूप घ्यायचे. तुपात थोडे जिरं आणि मोहरी घाला. तडतडल्यावर कडीपत्याची पानं घाला. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घाला आणि फोडणी तयार करा. सांबारात फोडणी ओता. छान चविष्ट सांबार गरमागरम भातासोबत खा.
