कढी वडा हे नाव ऐकलं की अनेकांच्या भुवया आधी उंचावतात. कढीमध्ये वडा? तेही बटाट्याचा? ऐकायला जरा विचित्रच वाटतं, पण पहिल्या घासातच ही शंका निघून जाते. कारण कढी वडा हा पदार्थ चवीच्या बाबतीत इतका छान आहे की तो खाल्ल्यावर हे आधी का नाही खाऊन पाहीलं? असंच वाटतं. कढी पकोडा तर फार आवडीने खाल्ला जातो. (Hot Kadhi and Crispy Potato Vada - Sounds strange? Try this delicious Kadhi Vada)मात्र कढीत बटाटा वडा तसा फार लोकांच्या माहिती पदार्थ नाही. पुण्यात हा पदार्थ बरेच ठिकाणी मिळतो. तसेच पुणे नाशिक हायवेवरही अनेक दुकाने आहेत. मराठवाडा, अहिल्यानगर, आदी काही ठिकाणी या पद्धतीने कढी वडा खाल्ला जातो.
गरम, कुरकुरीत वडे जेव्हा आंबट-तिखट, किंचित गोडसर कढीत बुडवले जातात, तेव्हा त्यांचा आतला भाग मऊ होतो आणि मसाल्याची चव पूर्णपणे कढीत उतरते. बाहेरुन साधी वाटणारी ही कढी वड्यामुळे अचानक चवच बदलते. या पदार्थाची क्रेझ नेमकी याच संतुलनामुळे आहे. कढी हलकी, पचायला सोपी आणि ताजी वाटते, तर वडा पोटभर आणि दिलखुलास समाधान देतो. सोशल मिडियामुळे असे पदार्थ सध्या व्हायरल होतात. अनेकांनी या कढी-वडाबद्दल व्हिडिओ तयार केले आहेत. गरम भात, ज्वारीची भाकरी किंवा साधी पोळी कशासोबतही कढी वडा अप्रतिम लागतो. मात्र शक्यतो तो नुसताच खाल्ला जातो.
फक्त कढी करताना त्यात थोडा बदल असतो. बटाटा वडा जरा नेहमीपेक्षा जास्त कुरकुरीत तळायचा म्हणजे चव जास्त छान लागते. कढी करताना नक्की काय करायचे जाणून घ्या. कढी नेहमीपेक्षा जरा घट्ट करायची. तसेच दही फेटून घ्यायचे. त्यात आलं - लसूण पेस्ट घालायची. जिरे घालायचे. नंतर कडीपत्याची फोडणी करुन नेहमी प्रमाणे कढी करायची. फक्त फोडणीत कांदाही घालायचा आणि थोडे लाल तिखटही. म्हणजे कढी जरा वेगळी लागते. भरपूर मोहरी घालायची. एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. सोशल मिडियावर व्हायरल असलेला हा पदार्थ सगळीकडे मिळत नाही. मात्र हे कॉम्बिनेशन घरीच तयार करणे तसे कठीण नाही. त्यामुळे नक्कीच करुन पाहा.
