Join us

भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:48 IST

तांदळाबद्दल भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

अमेरिकेतून येणाऱ्या तांदळाबद्दल भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. कारण एका नवीन रिपोर्टमध्ये अमेरिकन तांदळात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. आर्सेनिक हा एक रासायनिक घटक आहे जो नैसर्गिकरित्या खडक, माती आणि पाण्यात आढळतो. परंतु शरीरात त्याचं प्रमाण वाढल्यास कोमा, हृदयासंबंधित आजार, लिव्हर संबंधित आजार, मधुमेह आणि कॅन्सर होऊ शकतो.

तज्ज्ञांनी विशेषतः मुलं आणि गर्भवती महिलांना याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या रिपोर्टमध्ये भारतातील बासमती आणि थायलंडच्या जास्मिन तांदळाला सर्वात सुरक्षित तांदूळ असल्याचं म्हटलं आहे. हेल्दी बेबीज ब्राइट फ्युचर्स ही मुलांना हानिकारक रसायनांच्या संपर्कापासून वाचवण्यासाठी काम करणारी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. जिने आपल्या एका रिपोर्टमध्ये अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या तांदळात इनऑर्गेनिक आर्सेनिकचे प्रमाण सर्वाधिक आढळल्याचं म्हटलं आहे.

 

'या' लोकांना जास्त धोका 

द न्यूयॉर्क टाईम्समधील एका रिपोर्टनुसार, डार्टमाउथच्या गीझेल स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रोफेसर मार्गरेट करगास यांनी या संदर्भात म्हटलं आहे की, हा निष्कर्ष ‘What’s in your family’s rice? हे शीर्षक असलेल्या रिपोर्टमध्ये पब्लिश करण्यात आला आहे. लहान मुलं आणि गर्भवती महिलांना याचा जास्त धोका आहे. कारण गर्भवती महिला, लहान मुले आणि जे अनेकदा भात खातात ते लोक आर्सेनिकच्या विषारी परिणामांना सर्वाधिक बळी पडतात त्यांच्यासाठी हे अत्यंत चिंताजनक आहेत.

संशोधकांनी यासाठी Amazon, जो, सेफवे, कॉस्टको आणि टारगेटसारख्या रिटेल चेनमधून खरेदी केलेल्या १४५ प्रकारच्या तांदळाची चाचणी केली. नमुन्यांमध्ये अमेरिकेत पिकवलेले तांदूळ तसेच वेगवेगळ्या देशांमधून आयात केलेले तांदूळ यांचा समावेश होता.

 

तांदळाच्या नमुन्यांमध्ये अकार्बनिक आर्सेनिक 

सर्व तांदळाच्या नमुन्यांमध्ये अकार्बनिक आर्सेनिक आढळलं, जे धातूचं सर्वात विषारी स्वरूप आहे. धक्कादायक म्हणजे, या नमुन्यांपैकी सुमारे एक तृतीयांश नमुने मुलांसाठीच्या तांदळापासून बनणाऱ्या सीरियल्सचे होते, ज्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण FDA च्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होतं. बहुतेक अमेरिकन तांदळाच्या प्रकारांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण इतर धान्यांमध्ये आढळणाऱ्या पातळीपेक्षा २८ पट जास्त होतं.

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये आर्सेनिकचं प्रमाण हे जास्त आढळलं आहे. इटलीतील आर्बोरियो तांदूळ आणि अमेरिकेतील व्हाईट आणि ब्राऊन राईसमध्येही आर्सेनिकचं प्रमाण सर्वाधिक होतं. कॅलिफोर्नियातील पांढरा तांदूळ, थायलंडमधील जास्मिन तांदूळ आणि भारतातील बासमती तांदळात आर्सेनिकचे प्रमाण सर्वात कमी आढळलं आहे.

टॅग्स :कर्करोगअन्नआरोग्यअमेरिकाहेल्थ टिप्स