बटाटा आणि पालक हे कॉम्बिनेशन तसं फार चविष्ट असतं. फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकही असतं. बटाटा पालकाची भाजी तर नक्की खाल्ली असेल. एकदा बटाटा पालकाची अशी टिक्कीही करुन पाहा. (Healthy Snacks Recipe: make spinach-potato tikki at home, very easy and tasty recipe )चवीला फार मस्त लागते. नात्यासाठी करा. तसेच लहान मुलांना खाऊ म्हणून नक्कीच आवडेल. डब्यातही देऊ शकता. करायला जास्त वेळ लागणार नाही. तसेच थोडे कॉर्नफ्लावर नक्की घाला म्हणजे टिक्की फुटणार नाही. छान खमंग होईल. एकदा तरी ही रेसिपी नक्की करुन पाहा.
साहित्य
बटाटा, पालक, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, तांदूळाचे पीठ, कॉर्नफ्लावर, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, जिरे पूड, धणे पूड
कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा. गार झाल्यावर सोलून घ्यायचा. दोन शिट्या जास्त उकडला तरी चालेल. कारण बटाटा पूर्ण मऊ झालेला हवा. पालकाची पाने उकळून घ्यायची. पालक लगेच शिजतो. उकळल्यावर गार करायची. आणि त्याची पेस्ट तयार करुन घ्यायची. कांदा बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायचा. आल्याचा तुकडा घ्यायचा. आलं-लसूण-हिरवी मिरची अशी पेस्ट तयार करायची.
२. बटाटा मस्त कुस्करायचा. त्यात पालकाची पेस्ट घालायची. तसेच हिरवी मिरची- आलं - लसूण पेस्ट घालायची. मिक्स करायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. मस्त निवडायची स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. कोथिंबीरही मिश्रणात घालायची. त्यात मीठ घालायचे. तसेच चाट मसाला घालायचा. जिरे पूड घालायची आणि धणे पूडही घालायची. चमचाभर कॉर्नफ्लावर घालायचे. थोडे तांदूळाचे पीठ घालायचे आणि मिक्स करायचे. लाल तिकट घालायचे. सगळे पदार्थ मिक्स करायचे.
३. पिठाच्या गोल टिक्की तयार करायच्या. एका तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडे तेल सोडायचे. तेलावर तयार टिक्की मस्त खमंग परतायच्या. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत परतायच्या. सॉस किंवा चटणीशी लाऊन खा. मस्त लागतात. तसेच तेल कमी वापरा किंवा थोड्या तुपावर परता म्हणजे जास्त पौष्टिक होतील.