कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? कॉफीचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला कधी मिळू शकतात? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. सकाळी, संध्याकाळी की रात्री नक्की कधी कॉफी पिणे चांगलं आहे हे जाणून घेऊया. अनेकदा असं दिसून येतं की, लोक सकाळी उठताच उपाशीपोटी एक कप चहा किंवा कॉफी पितात. त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते.
उपाशीपोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात अॅसिड रिफ्लक्स होतं आणि त्यामुळे अॅसिडिटीची समस्या देखील वाढू शकते. तसेच याचा पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या मते, एका कप कॉफीमध्ये सुमारे १०० मिलीग्राम कॅफिन असतं, ते कॉफीच्या प्रकारावर देखील अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी कॉफी पिता तेव्हा शरीरात कोर्टिसोलची लेव्हल वाढते आणि तुम्हाला अधिक ताण जाणवू शकतो.
दुसरीकडे, रात्री कॉफी प्य़ायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्याचा तुमच्या मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तज्ञांच्या मते, कॉफी पिण्याची योग्य वेळ सकाळी ९:३० ते ११:०० दरम्यान असते, जेव्हा तुम्ही कॉफी पिण्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवू शकता. यावेळी कोर्टिसोलची पातळी कमी असते आणि कॅफिनचा शरीरावर होणारा परिणाम कमी असतो. जर तुम्हाला दुपारचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही दुपारी २-३ च्या दरम्यान एक कप कॉफी देखील पिऊ शकता.
आपण एका दिवसात किती कॉफी पिऊ शकतो? असाही प्रश्न अनेकांना पडतो. एफडीआयनुसार, एका दिवसात ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये. त्याच वेळी महिलांनी गर्भधारणेदरम्यान फक्त २०० मिलीग्राम कॅफिनचं सेवन करावं. हे कॅफिन केवळ कॉफीमधूनच नाही तर चहा, चॉकलेट, सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि इतर उत्पादनांमधून देखील मिळतं. अशा परिस्थितीत तुम्ही दिवसातून एक ते दोन कप कॉफी पिऊ शकता.