पोहे म्हणजे महाराष्ट्रातला खास आणि जिव्हाळ्याचा नाश्त्याचा पदार्थ आहे. सकाळची सुरुवात अनेक घरांमध्ये गरमागरम पोह्यांच्या चवीनेच होते. हलके, पचायला सोपे आणि चवीला मस्त असल्यामुळे पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. (Have you ever seen green poha? It tastes different than usual, try it - make it in five minutes and eat it with tea)प्रवासाला निघायचं असो, लग्नकार्य असो किंवा साधी रोजची सकाळ असो पोहे असले की सगळेच ताव मारुन खातात. महाराष्ट्रात पोह्यांना एक वेगळीच ओळख आहे. वरून टाकलेली कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि थोडीशी शेव यामुळे पोह्यांची चव आणखी खुलते. अनेक कार्यातही पोहे आणि चहा ही जोडी अगदी हमखास असते. पाहुणे आले की पटकन करता येणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणून पोहे खास मानले जातात. पिवळे पोहे जेवढे आवडीने खाता तेवढेच हे हिरवे पोहेही आवडतील पाहा कसे करायचे.
साहित्य
पोहे, शेंगदाणे, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, मोहरी, जिरे, पाणी, तेल, हळद, कडीपत्ता, कांदा, मीठ, हिंग
कृती
१. पोहे स्वच्छ धुवायचे. थोडावेळ निथळत ठेवायचे. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात आल्याचा लहान तुकडा घालायचा. तसेच भरपूर ताजी कोथिंबीर घ्यायची. पाणी न घालता वाटून घ्यायचे. वाटून पेस्ट झाली की थोडे पाणी घालून परत वाटायचे. म्हणजे एकजीव अशी पेस्ट तयार होते. तयार पेस्ट पोह्यांमध्ये ओतायची आणि पोहे ढवळून घ्यायचे. सगळीकडे समान लागेल याची काळजी घ्यायची.
२. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. एका कढईत किंवा पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल तापले की त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान फुलू द्यायचा. शेंगदाणे मस्त परतून घ्यायचे. मग त्यात कांदा घालायचा आणि कांदा खमंग परतायचा.
३. कांदा छान परतून झाल्यावर त्यात हळद घालायची. हिंग घालायचे. तसेच चवीपुरते मीठ घालायचे आणि फोडणी ढवळून घ्यायची. छान परतायचे आणि नंतर त्यात वाटण लावलेले पोहे घालायचे. पोहे मस्त ढवळून घ्यायचे. छान परतायचे. त्यात लिंबाचा रस घालायचा. झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढायची. पोहे फारच सुके झाले तर त्यात थोडे पाणी घालायचे. झाकण ठेवून वाफ काढायची म्हणजे छान मऊ आणि खमंग होतात.
