भाताचे विविध प्रकार भारतात आवडीने खाल्ले जातात. अगदी तयार व्हायला दोन - तीन तास लागणारे पदार्थ आणि पाच मिनिटांत होणारा फोडणीचा भातही केला जातो. ऑफीसला जायची घाई असली की मात्र झटपट होणाऱ्या रेसिपींचीच गरज असते. (Have you ever eaten spicy garlic rice? It tastes really good, Check out this delicious recipe.)अशा वेळी करण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. घरात फक्त लसूण असली की ही रेसिपी झटपट करता येते. चमचमीत भात आणि सोबत गार दही असेल तर मज्जाच येईल. पाहा लसूण भात करण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
भात, तेल, लसूण, लाल तिखट, कोथिंबीर, मोहरी, मीठ, लिंबू
कृती
१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. थोडी नाही तर भरपूर लसूण घ्यायची. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. शिळा भात असेल तर उत्तम. नसेल तर ताजा भात तयार करा आणि तो गार करुन घ्या. गरम भातात फोडणी तेवढी छान आणि व्यवस्थित मुरत नाही.
२. लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट एका कुटणीत घ्यायच्या. मिक्सरला वाटून घेतले तरी चालेल. मात्र कुटल्यावर ते मिश्रण जाडसर राहते. त्याची चव जास्त चांगली लागते. लसूण आणि लाल तिखटाची चटणी छान जाडसर कुटायची.
३. एका कढईत तेल गरम करायचे. गरम तेलात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात लसणाची चटणी घालायची. मस्त परतून घ्या. तिखटामुळे फोडणी जळू शकते. त्यामुळे गॅस मध्यमच ठेवायचा आणि फोडणी सतत ढवळत राहायची.
४. फोडणी परतून झालायावर त्यात भात घालायचा. ढवळून घ्यायचा आणि सगळीकडे फोडणी लागेल याची काळजी घ्यायची. नंतर त्यात मीठ घालायचे आणि ढवळून घेऊन नंतर एक वाफ काढून घ्यायची. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा. गरमागरम भात दह्यासोबत मस्त लागतो. नुसता खाल्ला तरी स्वादिष्टच लागतो.
