दह्याचे अनेक पदार्थ केले जातात. मात्र कधी दह्याचे कबाब केले आहेत का? अगदी सोपी रेसिपी आहे मात्र चवीला फारच मस्त आहे. जसे विविध प्रकारचे कबाब केले जातात त्याच प्रकारे करायचे. (Have you ever eaten Dahi Kebab? Now make it at home see the very easy and delicious recipe)फक्त स्टफींग भरताना काळजी घेणे गरजेचे. बाकी अगदी सिंपल रेसिपी आहे. नक्की करुन पाहा. लहान मुलांना नक्की आवडेल.
साहित्य
दही, कांदा, हिरव्या मिरची, आलं, कोथिंबीर, जिरं पूड, धणे पूड, मीठ, ब्रेडक्रम्प्स, मैदा, तेल , गरम मसाला, लाल तिखट, रवा
कृती
१. दही घट्ट पिळून घ्या. दोन वाट्या दही तरी नक्कीच लागते. त्यामुळे तीन वाट्या दही एका कापडात घ्या आणि पिळून त्याचे पाणी काढून घ्यायचे. तसेच कांदा बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीर मस्त बारीक चिरायची. दही कापडात बांधून किमान ३-४ तास लटकवून ठेवा. यामुळे दह्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि दही घट्ट व मऊ होईल.
२. एका भांड्यात हे घट्ट दही घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. नंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घाला किसलेले आले घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला आणि मीठ चवीनुसार घाला.
३. मिश्रणात ब्रेडक्रंब्स आणि दोन चमचे मैदा घालून नीट मिक्स करा. मिश्रण खूप पातळ असल्यास थोडे अजून ब्रेडक्रंब्स घालू शकता. मैद्याचे प्रमाण मात्र बेताचेच असू द्या. मिश्रण छान एक जीव करा. जरा घट्ट होऊ द्या. त्याला आकार देता येतो का पाहा.
४. एका ताटात रवा आणि ब्रेडक्रम्स घ्या. रवा अगदी थोडा घ्या. त्यात तयार मिश्रणाच्या टिक्की करुन घोळवा. पॅनमध्ये तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यावर तयार टिक्की लावा आणि दोन्ही बाजूनी परतून घ्या. तळले तरी चालेल. मात्र ते जास्त तेलकट होते. त्यापेक्षा असे फ्राय करणे जास्त चांगले ठरते.
गरमागरम कबाब हिरवी चटणी किंवा सॉससोबत खा. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असतात. चवीला छान लागतात आणि करायलाही सोपे आहे.