तुम्हालाही भात फार आवडत असेल तर त्याच नेहमीच्या रेसिपी सोडून भाताचे विविध प्रकार खाऊन पाहा. त्यापैकीच एक हा पालक आणि पनीर पुलाव. चवीला अतिशय छान आणि एकाच वेळी पौष्टिकही आहे. हा भाताचा प्रकार फार मसालेदार नसतो. (Get the nutrition of spinach and the protein of paneer from a delicious dish - make this green pulao in no time, even kids will love it)पण चव अगदीच रुचकर असते. पालकामुळे भाताला छान हिरवा रंग येतो. त्यामुळे दिसायलाही हा पदार्थ मस्त असतो. लहान मुले आवडीने खातात. पाहा कसा करायचा.
साहित्य पनीर, बासमती राईस, कांदा, हिरवी मिरची, हळद, मीठ , गरम मसाला, लाल तिखट, धणे - जिरे पूड, जिरे, आलं, लसूण, लिंबू , पालक, पाणी, तेल
कृती१. बासमती तांदूळ स्वच्छ धुवायचा आणि शिजवून घ्यायचा. मोकळा करुन परातीत पसरवून गार करत ठेवायचा. कांदा सोलायचा आणि नंतर बारीक चिरायचा. लसूण सोलून घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घ्यायचा. त्याची पेस्ट करायची. नंतर हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. पनीरचे तुकडे करायचे आणि ते थोड्या तेलावर छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे.
२. एका पातेल्यात पाणी गरम करायचे. पालक निवडायचा आणि त्याची पाने गरम पाण्यात उकळवायची. गार करायची आणि मग त्यात हिरवी मिरची घालून पेस्ट करायची. एका कढईत तेल घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलले की त्यात आलं - लसूण पेस्ट घालायची. परतायची आणि मग बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा खमंग गुलाबी परतायचा. त्यात पालक पेस्ट घालायची. जरा शिजली की मग त्यात चमचाभर हळद , चमचाभर गरम मसाला, तेवढेच लाल तिखट आणि थोडी धणे - जिरे पूड घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. अगदी थोडे पाणी घालायचे आणि मसाले शिजू द्यायचे.
३. मसाले शिजल्यावर त्यात पनीर घालायचे. जरा मिक्स करायचे. मग मोकळा केलेला भात घालायचा आणि लिंबाचा रस घालायचा, ढवळून घ्यायचे आणि एक वाफ काढायची. मस्त गरमागरम खायचा.