महाराष्ट्रात असे काही खास पदार्थ आहेत जे करायला फक्त स्वयंपाक करता येणं पुरेसं नसतं. ते पदार्थ करण्यासाठी अंगात कला असायला हवी. असे पदार्थ करता येतात तर पाककला जमते असे म्हटले जाते. (Ganesh Chaturthi recipes, Modak making tips, making modak is not easy but it can be with the help of some tips )साधे झटपट होणारे पदार्थ आपण नेहमीच करतो मात्र काही ठराविक सणांना एखाद्या प्रसंगी केले जाणारे काही पारंपरिक पदार्थ व्यवस्थित करता यावे यासाठी आजी-आईच्या ठेवणीतल्या रेसिपी शोधाव्या लागतात. तरीही बरेचदा रेसिपी फसतेच. असे काही पदार्थ म्हणजे पुरणपोळी, मोदक, सांज्याच्या पोळ्या, खरवस इतरही अनेक गोडाचे पदार्थ आहेत जे करण्यासाठी योग्य प्रमाण, लक्ष आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असते.
आता घरोघरी मस्त मऊ-खमंग मोदक केले जातील. बाप्पाला आवडणारे मोदक बाळगोपाळांनाही फार प्रिय असतात. सगळेच तुपाची धार सोडून आनंदाने मोदकांचा आस्वाद घेतात. मात्र मोदक करायचे म्हणून अनेकांना टेंशनही येतं. कारण आदल्या वर्षी पीठ, सारण काहीतरी जरा चुकलेलं असतं. पण काळजी करु नका. या काही टिप्स लक्षात ठेवा मोदक अजिबात फसणार नाही. सगळ्यांना मनापासून आवडेल.
१. मोदकासाठी तांदळाची उकड काढताना पाणी गरम करताना त्यात किंचित मीठ घालायचे. तसेच चमचाभर तूप घालायचे. तांदळाचे पीठ चाळताना त्यात चमचाभर कॉर्नफ्लावर किंवा साबुदाण्याचे पीठ घाला अगदी एक चमचा पुरेसे होते. असे केल्यामुळे पारी करताना पडणाऱ्या भेगा टाळता येतात. मोदक मस्त मऊ होतो.
२. मोदक उकडताना काही वेळा फुटतो. तो फुटू नये यासाठी मोदक तयार करुन झाल्यावर त्याचा खालचा भाग पाण्यातून बुडवून घ्यायचा असतो. मोदक ताटाला चिकटू नये यासाठी त्याला खाली पाणी लावायचे. पाणी लावले नाही तर मोदक चिकटतो आणि उचलताना तो खालून फुटतो. त्यामुळे मोदक रचण्याआधी पाण्यातून काढायचा.
३. मोदकाच्या सारणाला बरेचदा पाणी सुटते. त्यामुळे मोदक केल्यावर ते आतून ओले होतात आणि फुटतात. सारण करताना गूळ, नारळ एकजीव झाल्यावर त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालायचे. ते नीट एकजीव करुन घ्यायचे. त्यामुळे सारणाला सुटणारे सारे पाणी शोषून घेतले जाते. मोदकाचे सारण मस्त मऊ आणि गरजेपुरते कोरडे होते.