कांदा भजी आणि ब्रेड पकोडा हे दोन्ही पदार्थ भारतात आवडीने खाल्ले जातात. चहासोबत वडा, भजी, पकोडा हे पदार्थ खायची मजाच काही वेगळी असते. (Fusion of Bread Pakoda and Onion Bhaji - Eat hot onion bread pakoda with tea, must try quick recipe )कांदा भजी आणि पकोडा दोन्ही आवडत असेल तर हा पदार्थ खास तुमच्यासाठीच आहे. ब्रेड पकोडा आणि कांदा भजी यांचे फ्यूजन करुन हा ब्रेड ओनियन पकोडा तयार करा. अगदी सोपी रेसिपी आहे. काही मिनिटांत होते. पाहा कसा करायचा.
साहित्य
कांदा , बेसन, तांदूळ पीठ, मीठ, लाल तिखट, ब्रेड, हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर, आलं, गरम मसाला, धणे -जिरे पूड, पाणी, तेल, ओवा
कृती
१. कांदा सोलून घ्यायचा आणि लांब - लांब पातळ चिरायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीर ताजी मस्त आणायची आणि निवडायची. एकदम स्वच्छ धुवायची आणि नंतर बारीक चिरायची. आलं किसून घ्यायचे. ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करायचे. एका ब्रेडचे दोन त्रिकोण होतात.
२. एका खोलगट पातेल्यात किंवा परातीत थोडे बेसन घ्यायचे. त्यात तांदूळाचे पीठ घालायचे. बेसन जर दोन वाट्या घेतले तर तांदुळ पीठ एक वाटी घ्यायचे. त्याहून कमी घेतले तरी चालेल. तांदुळ पीठ छान कुरकुरीत असा पदार्थ होण्यासाठी मदत करते. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात घालायची. किसलेले आले घालायचे. थोडी धणे - जिरे पूड घालायची. तसेच थोडा गरम मसाला घालायचा. हातावर मळून थोडा ओवा घालायचा.
३. सगळे पदार्थ एकत्र करुन मिक्स करायचे. नंतर त्यात थोडे पाणी घालून कालवायचे. जास्त पातळ करु नका. मध्यम घट्ट असे मिश्रण तयार करायचे. त्यात चवीपुरते मीठ घालायचे. ढवळून घ्यायचे. कढईत तेल तापत ठेवायचे. ब्रेडच्या तुकड्याला तयार केलेले मिश्रण मस्त लावायचे. सगळीकडे लागायला हवे. नंतर गरमागरम तेलात खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. आत ब्रेड छान मऊ राहतो. तसेच कांदा आणि बेसन तळल्यावर कुरकुरीत होते. चटणीसोबत किंवा सॉससोबत हा पदार्थ खा.
