नारळीपौर्णिमा म्हणजे नारळाचे खास पदार्थ. समुद्राला नारळ अर्पण करुन आता आम्हाला आशीर्वाद दे आणि कामाला सुरवात करु दे अशी प्रार्थना करत कोळीबांधव हा सण फार थाटामाटात साजरा करतात. रक्षाबंधन आणि पौर्णिमा एकाच दिवशी साजरी केली जाते. विविध गोडाचे पदार्थ केले जातात. (food tips, Narali Pournima Special: remember these tips to prevent making mistakes while cooking coconut food)मात्र या दिवसाची खासियत म्हणजे खास नारळाचे पदार्थ केले जातात. या दिवशी बाकीचे पदार्थ करायची पद्धत घरोघरी वेगळी असते मात्र या दिवशी नारळी भात केला जातो. छान गोडसर असा हा भात चवीला मस्त असतो. त्यासोबत प्रसादाला केली जाणारी नारळाची करंजीही एकदम खमंग असते. नारळी भात कधी तरी चिकट होतो आणि करंज्या तळताना फुटतात. यावर्षी काही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे असे काहीच होणार नाही. तसेच नारळाचे लाडू करतानाही ते अतिमऊ होतात. पाहा टिप्स.
नारळीभात करताना लक्षात ठेवा :
१. नारळी भात करताना मुख्य म्हणजे चांगला तांदूळ निवडायचा. बासमती तसेच आंबेमोहर असे मोकळ्या भाताचे तांदूळच घ्या. म्हणजे भात गिचका नाही होणार. साधा तांदूळ साखरेत मिसळल्यावर त्याचा लगदा होतो.
२. नारळ ताजाच वापरा. फ्रिजमध्ये ठेवलेला नारळ वापरण्यापेक्षा ताजा फोडलेला नारळ घ्यायचा. त्याची चव जास्त छान लागते.
२. काही जण गुळाचा भात करतात तर काही साखरेचा. गूळ किंवा साखर काहीही वापरा मात्र आधी भात परतून मग त्यात गोडाचे पदार्थ घालायचे. म्हणजे ते एकजीव होतात. पाक आधी तयार करुन नंतर त्यात भात घातल्यास त्याचा लगदा होतो.
नारळाचे लाडू करताना लक्षात ठेवा :
नारळाचे लाडू मऊच छान लागतात. पारंपरिक पद्धत तशीच आहे मात्र काही वेळा लाडू खुपच जास्त मऊ होतात. अशावेळी त्यात थोडे सुके खोबरे घालायचे त्यामुळे लाडू जरा घट्ट होतो. त्याला आकार देणे सोपे जाते. तसेच पिठीसाखर घालणेही फायद्याचे ठरते.
नारळाची करंजी तळताना फुटू नये यासाठी काय करावे ?
करंजीचे सारण खुपच जास्त ओले राहणार नाही याची काळजी घ्यायची. सारणामुळे पीठ जास्त सैल झाले की त्यातून सारण बाहेर येते आणि करंजी फुटते. कोमट सारण कधीही भरु नका. सारण गार करायचे आणि मगच करंजीत भरायचे. तेल मुळात मध्यम गरम हवे. जास्त गरम तेल असेल तर करंजी फुटते. तेलाचे तापमान योग्य ठेवावे. पाळी बंद करताना व्यवस्थित दोन्ही टोके जुळवावी. त्यात भोक पडणार नाही किंवा तेल आत जाणार नाही याची काळजी घ्या.