साखर मलाई पराठा हा एक जुना पारंपरिक गोड पदार्थ असून लहान मुलांचा आवडता नाश्ता किंवा डबा म्हणून ओळखला जायचा. पूर्वी घरोघरी सकाळच्या नाश्त्याला किंवा शाळेच्या डब्यात आई हा पराठा आवर्जून करत असे. पण आजकालच्या जीवनशैलीत हा पदार्थ जरा मागेच पडल्यासारखा वाटतो. (Food for children sugar malai paratha is a childhood memory, make sure to try this five-minute recipe )तरीही याची चव आणि आठवण आजही अनेकांच्या मनात आहे. या पराठ्यात मलाईची मऊसर चव आणि साखरेची गोडी मिळून एक अप्रतिम चव निर्माण होते जी मुलांना खूपच आवडते. लहानच नाही तर सगळ्यांसाठीच हा पदार्थ एकदम मस्त आहे. करायला अगदीच सोपा आहे. नक्की करुन पाहा.
साहित्य गव्हाचे पीठ, मीठ, तूप, दुधाची साय, साखर, वेलचीपूड
कृती१. सर्वप्रथम गव्हाच्या पीठात मीठ आणि तूप घालून मऊसर पीठ मळायचे. हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या. मीठ अगदीच चिमुटभर घाला. तयार पीठ झाकून ठेवा. किमान १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा म्हणजे छान मुरते.
२. एका परातीत किंवा खोलगट भांड्यात ताजी दुधाची साय घ्या. त्यात साखर घाला. जर वाटीभर गव्हाचे पीठ असेल तर किमान अर्धी वाटी साखर हवी. त्यात चमचाभर वेलची पूड मिसळून गोड सारण तयार करायचे. हवे असल्यास त्यात थोडा सुकामेवा किंवा खोबरेही घालता येते. चव मस्त लागते. तसेच खाताना सुकामेवा कुरकुरीत लागतो. पिठाच्या लहान लहान गोळ्या म्हणजेच लाट्या तयार करुन घ्यायच्या.
३. प्रत्येक लाटी मध्यम आकाराच्या पोळीसारखी लाटून घ्यायची. त्यात हे तयार केलेले सारण भरून नीट बंद करा आणि हलक्या हाताने पुन्हा लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर तूप घालायचे. त्यावर लाटलेला पराठा दोन्ही बाजूने मस्त परतून घ्यायचा. पराठा गरमागरम खायचा करा.
हा पराठा गरम खाताना सायीची आणि साखरेची रसाळ चव तुपावर परतलेल्या पोळीमुळे मस्त लागते. खमंग परतून घ्यायचे. मुलांना ही गोडसर चव विशेष आवडते त्यामुळे लहान मुलांचा खाऊ म्हणून असे पराठे करता येतात.