उपासाच्या दिवशीचे पदार्थ जास्त चविष्ट असतात असे अनेक जण म्हणतात आणि ते अगदीचे खरे आहे. (fasting recipe : make this tasty recipe in few minutes, potato recipe, easy to make )कारण ठराविक पदार्थांमध्ये मस्त आणि पौष्टिक अन्न तयार करता येते. उपासाचे पदार्थ करायला अगदी सोपे असतात आणि कमी वेळेत करता येतात. झटपट होऊन जातात. फार वेळ लागत नाही आणि पोटभरीचे असतात. दिवसभर पोटाला आराम आणि आधार मिळतो.
उपासाला घरोघरी केली जाणारी बटाटा भाजी दह्याशी खाण्यात एक वेगळेच समाधान मिळते. चव फार मस्त लागते आणि करायलाही सोपी आहे.
साहित्य
बटाटा, जिरे, हिरवी मिरची, दही, तूप, पाणी, शेंगदाणे, मीठ, दाण्याचे कुट, नारळ
कृती
१. बटाटा उकडत लावायचा. बटाटे एका कुकरमध्ये घ्यायचे आणि त्यात पाणी ओतायचे. कुकरला उकडत लावताना त्यात चमचाभर मीठ घालायचे. जरा एक शिटी कमीच काढायची. म्हणजे भाजीसाठी योग्य असा बटाटा उकडला जातो.
२. बटाटा उकडून होईपर्यंत हिरव्या मिरची वाटून घ्या. मिरचीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटायचे. शेंगदाणे परतायचे आणि त्याची साले काढून घ्यायची. ताजा नारळ फोडायचा आणि मस्त खवायचा.
३. बटाटे उकडून झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची. मध्यम आकाराचे तुकडे करायचे. एका कढईत थोडे तूप घ्यायचे आणि जरा कोमट करायचे. तूप तापल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. शेंगदाणे घालायचे आणि सगळं छान परतून घ्यायचे. बटाट्याचे तुकडे घालायचे आणि परतायचे. जरा खमंग झाले की त्यात दाण्याचे कुट घालायचे आणि ओला नारळ घालायचा. चवी पुरते मीठ घालायचे आणि ढवळायचे.
४. झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढायची नंतर दोन मिनिटे बटाटा परतायचा आणि मग गॅसबंद करायचा आणि ताटात गरमागरम भाजी घ्यायची. दह्यात जिरे पूड घालायची तसेच थोडी वाटलेली हिरवी मिरची घालायची आणि दह्यात मिक्स करायची. भाजी ताटात घेतल्यावर त्यावर हे मसाला दही घ्यायचे. भाजी आणि दही एकजीव करायचे आणि मस्त गरम खायचे.