सुरण ही पारंपरिक अतिशय पौष्टिक भाजी आहे. ग्रामीण भागात तर सुरणाला खास महत्व आहेच, मात्र तरुण मुलं - मुली आता सुरण खायला नाकं मुरडतात. आपल्या या पारंपरिक भाज्या खाल्या तर खरंतर महागातल्या पाश्चात्य पदार्थांची गरजच भासणार नाही. (Elephant foot yam, exotic Indian vegetables, must have healthy food all the time )हिवाळ्यात विशेषतः सुरण खाल्ले जाते, कारण ते शरीराला उष्णता आणि ताकद देणारे मानले जाते. योग्य प्रकारे शिजवून खाल्ल्यास सुरण चविष्ट आणि आरोग्यदायी ठरते.
सुरणाचे लोकप्रिय पदार्थ
सुरणाची भाजी हा सर्वात सामान्य पदार्थ आहे. मसालेदार सुरण भाजी, रस्सेदार सुरण, किंवा कोरडी फोडणीची भाजी अनेक घरांत केली जाते. काही ठिकाणी सुरणाचे काप करून तळले जातात. सुरणाचे कटलेट, कबाब, पराठा, भजी असे नवनवीन पदार्थही केले जातात. महाराष्ट्रात काही ठिकाणी सणासुदीला सुरणाची खास भाजी केली जाते. तसेच उपवासासाठीही काही लोक सुरणाचा वापर करतात.
सुरण खाण्याचे फायदे
सुरणामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यात लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६ यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. सुरण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते, कारण त्यातील फायबर साखर पचवण्यासाठी मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही योग्य प्रमाणात सुरण उपयोगी ठरु शकते. हृदयाच्या आरोग्यासाठीही सुरण चांगले मानले जाते. त्यातील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. तसेच सुरणामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते. वजन नियंत्रणासाठीही सुरण उपयुक्त ठरू शकते. फायबर जास्त असल्यामुळे पोट भरते. अनावश्यक खाणे कमी होते.
सुरण खाताना काय काळजी घ्यावी?
सुरणामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण असते. त्यामुळे काही लोकांना सुरण खाल्ल्यानंतर घशात खवखव किंवा खाज येऊ शकते. म्हणून सुरण शिजवताना त्यात चिंच, ताक किंवा लिंबाचा रस घालतात, ज्यामुळे खाज कमी होते. सुरण व्यवस्थित शिजवूनच खावे, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले सुरण त्रासदायक ठरू शकते.
कोणी सुरण खाणे टाळावे?
ज्यांना मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन) होण्याचा त्रास आहे त्यांनी सुरण मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे, कारण त्यातील ऑक्सलेट्स त्रास वाढवू शकतात. ज्यांना वारंवार अॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होतो त्यांनी सुरण जास्त मसालेदार स्वरुपात खाणे टाळावे. लहान मुलांना सुरण देताना काळजी घ्यावी आणि अगदी मऊ शिजवूनच द्यावे.
