असे काही पदार्थ आहेत जे आपण वर्षानुवर्षे खात आलो आहोत. लहानपणी हे पदार्थ खायची मजा जेवढी होती तेवढीच आजही आहे. जसे की शेंगदाणे किंवा खारे दाणे. पाच रुपयाची पुडी मिळायची. शाळेत किंवा खेळायला जाताना दुकानातून हे दाणे आपण घ्यायचो. त्यातलाच एक प्रकार होता मसाला शेंगदाणा. हा पदार्थ एकदम कुरकुरीत आणि मसालेदार लागायचा. (Eat Masala Peanuts - make it at home, Check out this spicy Masala Peanuts recipe)आजही सगळे तो तेवढ्याच आवडीने खातात. हे मसाला शेंगदाणे घरी करणेही तेवढेच सोपे आहे. फार काही वेगळे साहित्य वापरावे लागत नाही आणि करायला जास्त वेळही लागत नाही. पाहा हे मसाला दाणे करण्याची सोपी आणि झटपट रेसिपी.
साहित्य
शेंगदाणे, तेल, बेसन, तांदूळाचे पीठ, मीठ, लाल तिखट, पाणी, हळद, आलं, लसूण, गरम मसाला, चाट मसाला
कृती
१. शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची. नंतर एका खोलगट भांड्यात शेंगदाणे घ्यायचे. त्यात चार चमचे बेसन घालायचे. बेसन घातल्यावर दोन चमचे तांदूळाचे पीठ घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची. दोन चमचे लाल तिखट घालायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याची आणि लसणाची पेस्ट तयार करायची. ती पेस्टही मिश्रणात घालायची. त्यात चमचाभर गरम मसाला घालायचा. मिक्स करायचे.
२. हातानेच मिक्स करा. नंतर त्यात दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आणि पुन्हा मिक्स करायचे. जरा चिकट होते मात्र पातळ करायचे नाही. थोडे घट्ट आणि चिकट चालेल. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल छान तापल्यावर गॅस मध्यम ठेवायचा. नंतर त्यात शेंगदाणे सोडायचे. जरा कुरकुरीत व्हायला लागले की झाऱ्याच्या मदतीने दाणे वेगवेगळे करायचे. छान लालसर झाले की काढून घ्यायचे. गार करायचे आणि हवाबंद डब्यात भरुन ठेवायचे. छान राहतात. ताजे खाल्ले तर जास्त छान लागतात.
