तळणीचे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. कुरकुरीत वडा, भजी, चकल्या किंवा तळलेले पापड यांची चव वेगळीच असते. मात्र तळणीचे पदार्थ जास्त तेलकट झाले तर पोटावर ताण येतो, अपचन, अॅसिडिटी किंवा जडपणा जाणवू शकतो. तळणीचे पदार्थ मुळातच आरोग्यासाठी चांगले नसतात. पण असे तळलेले पदार्थ खायची इच्छा झाल्यावर मनाला ते खाल्याशिवाय शांतता मिळत नाही. मात्र योग्य पद्धतीने तळणीचा वापर केला तर पदार्थ चविष्ट राहतात आणि त्यांचा त्रासही कमी होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ तळताना पाहा काय करावे.
तळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. नेहमी ताजे आणि स्वच्छ तेल वापरावे. वारंवार वापरलेले किंवा जळलेले तेल आरोग्यास अपायकारक ठरु शकते. तेल योग्य तापमानावर असणेही तितकेच गरजेचे आहे. तेल फार थंड असेल तर पदार्थ तेल शोषून घेतात आणि फार तापलेले असेल तर पदार्थ पटकन जळतात. मध्यम आचेवर योग्य तापमान ठेऊन पदार्थ तळल्यास कुरकुरीत होतात आणि कमी तेल शोषले जाते.
पदार्थ तळताना भांड्यात एकदम जास्त पदार्थ घेऊ नयेत. थोडे - थोडे पदार्थ सोडावेत. जास्त पदार्थ एकत्र घातल्याने तेलाचे तापमान कमी होते आणि त्यामुळे पदार्थ अधिक तेलकट होतात. थोडे - थोडे करून तळणी केल्यास प्रत्येक पदार्थ व्यवस्थित तळला जातो. तळणी झाल्यावर पदार्थ थेट कागदी टिश्यू किंवा जाळीदार चाळणीत काढल्यास अतिरिक्त तेल निघून जाते. वर्तमानपत्र किंवा लिखित कागद वापरणे टाळा.
तळणीचे पदार्थ तयार करताना कणिक किंवा पीठ फार सैल नसावे. फार पातळ पीठ असल्यास पदार्थ जास्त तेल पितो. योग्य घट्टपणा ठेवल्यास तळणी हलकी आणि कुरकुरीत होते. तसेच तळणीचे तेल गरम करताना आच वारंवार बदलू नये. स्थिर आणि मध्यम आचेवर तळणी ठेवल्याने पदार्थ आतून कच्चा राहत नाही.
तळणीचे पदार्थ खाल्ल्यानंतर होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांचा अतिरेक टाळणेही महत्त्वाचे आहे. तळणीचे पदार्थ गरमागरम आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ते सहज पचतात. जेवणात त्यासोबत ताक, कोशिंबीर किंवा पचनास मदत करणारे पदार्थ घेतल्यास पोटावरचा ताण कमी होतो. त्यामुळे वडा, भजी असे पदार्थ खाल्यावर ताक पिणे वगैरे गोष्टी फायद्याच्या ठरतात.
थोडक्यात, तळणीचे पदार्थ पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी योग्य पद्धतीने तळणी केल्यास आरोग्याला कमी हानीकारक ठरते. तेलाची निवड, तापमान, प्रमाण आणि खाण्याची सवय याकडे लक्ष दिल्यास तळणीचे पदार्थ चविष्टही राहतात आणि पोटालाही त्रास देत नाहीत.
