आंब्याच्या हंगामात केल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि बहुउपयोगी पदार्थांपैकी एक म्हणजे आंबोशी. जुन्या काळी फ्रिजसारख्या सोयी नसताना अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात, त्यापैकी उन्हात वाळवून पदार्थ साठवण्याची पद्धत खूप लोकप्रिय होती. (Easy way to preserve mangoes for whole year -make mouth watering amboshi, see the uses and recipe)त्यातूनच आंबोशीसारखा पदार्थ तयार झाला असावा. आजही ग्रामीण भागात तसेच पारंपरिक स्वयंपाक केल्या जाणाऱ्या घरांमध्ये आंबोशी मोठ्या आवडीने केली आणि वापरली जाते.
आंबोशी म्हणजे नेमकं काय?
आंबोशी म्हणजे कच्च्या कैरी सोलून, तुकडे करून उन्हात पूर्णपणे वाळवून केलेला पदार्थ. हे तुकडे पूर्ण कोरडे आणि कडक झाल्यावर दीर्घकाळ टिकतात. त्यात नैसर्गिक आंबटपणा टिकून राहतो, त्यामुळे विविध पदार्थांना आंबट चव देण्यासाठी ती उपयोगी पडते. साधारणपणे ज्या भागात आंब्यांचे उत्पादन जास्त असते, तिथे आंबोशी मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते. वाळवायला किमान १२ दिवस लागतात.
आंबोशी तयार करण्याची पारंपरिक पद्धत
आंबोशी बनवण्यासाठी सर्वप्रथम योग्य कैऱ्या निवडणे खूप महत्त्वाचे असते. कैऱ्या कच्च्या, टणक आणि आंबट असाव्यात. फार पिकलेल्या किंवा मऊ कैऱ्या वापरू नयेत, कारण त्यातून चांगली आंबोशी तयार होत नाही. निवडलेल्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी किंवा पातळ काप करा. हे तुकडे करताना कोय काढून टाकला जातो. काहीजण या तुकड्यांना थोडे मीठ लावून एक दिवस झाकून ठेवतात, ज्यामुळे कैऱ्यांमधील अतिरिक्त पाणी बाहेर पडते आणि वाळवण्याची प्रक्रिया जलद होते. दुसऱ्या दिवशी हे तुकडे स्वच्छ कापडावर, चाळणीवर किंवा प्लास्टिक शीटवर एकसारखे पसरवले जातात.
यानंतर हे तुकडे ४ ते ६ दिवस कडक उन्हात वाळवले जातात. दररोज त्यांना उलटसुलट केल्यास ते समान प्रमाणात वाळतात. पूर्णपणे वाळल्यावर तुकडे कडक, हलके आणि कोरडे होतात. आंबोशी तयार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवली जाते. योग्य प्रकारे साठवली तर ती वर्षभर टिकते. आंबोशीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आमचूर पूड तयार करणे. बाजारात मिळणारी आमचूर पूड अनेकदा प्रक्रिया केलेली असते, पण घरची आंबोशी वापरून बनवलेली पूड अधिक शुद्ध आणि नैसर्गिक चवीची असते.
आंबोशी फक्त लोणचे किंवा आमचूरसाठीच नाही, तर आमटी, भाजी किंवा कढीमध्ये आंबटपणा आणण्यासाठीही वापरली जाते. काही ठिकाणी ती थेट डाळीत टाकतात. त्यामुळे पदार्थाला नैसर्गिक आणि हलका आंबट स्वाद मिळतो. आंबोशीमध्ये कच्च्या आंब्याचे गुणधर्म टिकून राहतात. ती पचनास मदत करते आणि भूक वाढवते.
