नाश्त्यासाठी तसेच डब्यासाठी फार चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे पनीरचा पराठा. करायला अगदी सोपा आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे. त्यात चीज घातले तर लहान मुलांना आणखी आवडेल. (Easy way to make paneer paratha, absolutely delicious recipe , healthy recipes must try)बरेचदा पनीर पराठा करताना तो फाटतो मात्र पीठ फक्त मैदा किंवा कणीक न घेता या पद्धतीने घेतले तर पराठा अजुबात फाटणार नाही. आणि मस्तही होईल.
साहित्य पनीर, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, मैदा, मीठ, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, पाणी, तूप, कोथिंबीर
कृती१. मस्त ताजे पनीर घ्यायचे. थंड असेल तर साधे होऊ द्यायचे. मग पनीर किसून घ्यायचे. कांदा घ्यायचा. सोलायचा आणि कांदा बारीक चिरायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा. हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट करुन घ्यायची. ताजी कोथिंबीर घ्यायची. स्वच्छ निवडायची आणि बारीक चिरायची.
२. तसेच एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे. त्यात चमचाभर मैदा घालायचा. आणि गरम तूप घालायचे. मीठ घालायचे आणि पीठ मळायचे. पीठ जरा घट्ट मळायचे. जास्त सैलसर पीठ असेल तर पराठा फाटेल.
३. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. त्यावर आले-लसूण पेस्ट घालायची तसेच किसलेले पनीर घालायचे. त्यात धणे पूड घालायची आणि जिरे पूडही घालायची. गरम मसाला घालायचा. मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त परतायचे. परतून झाल्यावर गार करत ठेवायचे.
४. थोडावेळ पीठ सेट होऊ द्यायचे. नंतर लाट्या तयार करायच्या आणि त्यात पनीरचे सारण गार करुन भरायचे. सगळीकडून लाटी बंद करायची आणि मग मग लाटायची. लाटताना त्याला थोडा मैदा लावायचा. मैदा किंवा तांदळाचे पीठ लावा. म्हणजे लाटताना फाटणार नाही.
५. तव्याला थोडे तूप लावायचे आणि त्यावर लाटलेला पराठा मस्त खमंग परतून घ्यायचा. लाटताना आकार जरा लहानच ठेवा म्हणजे पराठा उलथताना फाटणार नाही. गरमागरम खा.