ताकाची कढी सगळ्यांनाच फार आवडते. करायला सोपी असते आणि चवीलाही मस्त. कढी- खिचडी तसेच कढी - भात खाल्यावर आत्मा तृप्त होतो. शिवाय कढी आरोग्यासाठी चांगली. कढी करायच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसाला कढी. ही रेसिपी मस्त चमचमीत आणि मसालेदार आहे. नक्की करुन पाहा.
साहित्य
बेसन, दही, पाणी, मीठ, हळद, कांदा, कडीपत्ता, मेथी दाणे, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, धणे, मोहरी, तेल, हिंग, जिरं
कृती
१. मस्त मध्यम पातळ असं ताक तयार करुन घ्या. एका खोलगट भांड्यात बेसन घ्या. त्यात ताक ओता बेसन आणि ताक एकत्र घुसळून घ्यायचे. बेसन अगदी काही चमचे पुरे होते. जास्त बेसन घेतले तर कढी एकदम घट्ट होईल.
२. कांदा सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. आलं किसून घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. हिरव्या मिरचीची आणि लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करुन घ्या. कोथिंबीर निवडून घ्या आणि मग छान बारीक चिरुन घ्या.
३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात धणे घाला, जिरं घाला तसेच हिंगही घाला आणि मग किसलेलं आलं घालून परतून घ्या. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घाला. ते ही परतून घ्या. कडीपत्ता घाला. कडीपत्ता जरा जास्त वापरा. मेथीचे चार दाणे घाला. हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घाला. सगळं छान परतून घ्या.
४. फोडणीत कांदा घाला आणि कांदा छान गुलाबी परतून घ्या. बेसन आणि ताकाच्या मिश्रणात थोडा हळद घाला आणि घुसळून घ्या. ते मिश्रण फोडणीत ओता. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चवी पुरते मीठ घालून कढी छान उकळू द्या. कढीला उकळी आल्यावर गॅस बंद करा.
५. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं घाला आणि कडीपत्ता घाला. जरा परतल्यावर गॅस बंद करा आणि लाल तिखट घाला. फोडणी लगेच कढीत ओता, म्हणजे लाल तिखट करपणार नाही.