रोज रोज नाश्त्याला काय करावं पटकन सुचत नाही. नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी खाण्याचं सर्वांचंच मन होतं. अशावेळी तुम्ही पौष्टीक शेवयांचा उपमा बनवू शकता (Easy Sevai Upma Recipe). रव्याचा उपमा बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा तो परफेक्ट बनत नाही. शेवयांचा उपमा करायला अगदी सोपा असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. शेवयांचा उपमा करताना तुम्ही यात आपल्या आवडीनुसार भाज्या घालून अधिक हेल्दी बनवू शकता (Cooking Hacks). गव्हाच्या शेवया या उपम्यासाठी वापरल्या तर अधिक उत्तम. शेवयांचा उपमा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Sevai Upma)
शेवयांच्या उपम्यासाठी लागणारं साहित्य
१ कप शेवया
१ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
१/२ कप गाजर (बारीक चिरलेले)
१/२ कप मटार (फ्रोजन किंवा ताजे)
१/२ कप शेंगदाणे
१ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरे
कढीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१/२ इंच आले (किसलेले)
१/४ चमचा हळद
लिंबाचा रस (आवश्यकतेनुसार)
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
तेल
मीठ चवीनुसार
शेवयांचा उपमा करण्याची कृती
१) सर्वात आधी एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात शेवया हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्या. शेवया भाजल्यामुळे त्या चिकट होत नाहीत. भाजलेल्या शेवया एका प्लेटमध्ये काढून घ्या.
२) त्याच कढईत पुन्हा थोडे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घाला. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
३) आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर किसलेलं आलं घालून एक मिनिट परतून घ्या. गाजर आणि मटार घालून झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा. भाज्या थोड्या मऊ झाल्यावर शेंगदाणे घालून चांगले परतून घ्या.
चहात आधी काय घालावं-दूध,साखर की चहा पावडर? पाहा टपरीस्टाईल कडक चहा करण्याची पद्धत
४) या मिश्रणात हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा. आता भाजलेल्या शेवया त्यात घाला आणि चांगले ढवळा. शेवयांच्या दुप्पट गरम पाणी तयार ठेवा. गरम पाणी शेवयांमध्ये घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करा.
महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीचे पाहा १० प्रकार, नावं वेगळी पण थाट तोच-मानही तसाच खास
५) आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे वाफ येऊ द्या. मध्ये मध्ये झाकण काढून एकदा ढवळून घ्या. शेवया पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.