कोबीची भाजी सगळ्यांनाच आवडते असे नाही. कोबीची मस्त चमचमीत पचडी केली जाते. कोशिंबीरही केली जाते. चवीला हे पदार्थ एकदम मस्त लागतात. (easy recipes, Try the spicy onion-cabbage chutney , must try recipes, good food )चटणी हा पदार्थ भारतात घरोघरी केला जातो. मस्त वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या असातत त्यापैकीच एक म्हणजे ही कोबीची चटणी. करायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की करुन पाहा. नारळाची चटणी तसेच दाण्यांची चटणी कायम केली जाते. टोमॅटोची चमचमीत चटणीही केली जाते. मात्र एकदा ही चटणी खाऊन पाहा याचीही चव एकदम वेगळी आहे. कोबी जर आवडत नसेल तर कोबी नक्की आवडायला लागेल.
साहित्य
कांदा, कोबी, लसूण, कोथिंबीर, मीठ, मोहरी, तेल, काश्मीरी लाल मिरची, हिंग, जिरे, कडीपत्ता, हळद, लाल तिखट
कृती
१. कांद्याची सालं काढून घ्या आणि कांदा चिरुन घ्या. तसेच कोबी मस्त किसून घ्यायचा. कोथिंबीर चिरायची आणि काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे करायचे.
२. एका कढईत तेल घ्यायचे. त्यावर जिरे घालायचे आणि जरा तडतडले की त्यात कोबी घालायचा आणि छान परतायचा. कोबी परतून झाल्यावर त्यात कांदा घालायचा. कांदाही खमंग परतायचा. तसेच त्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घालायचे. व्यवस्थित परतून घ्यायचे. सगळं छान खमंग परता आणि मग गार करत ठेवा.
३. गार झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यात थोडे पाणी घालायचे आणि मिक्सर फिरवायचा. मस्त चटणी वाटून घ्यायची. वाटून झाल्यावर एका वाडग्यात काढून घ्यायची. सगळे पदार्थ नीट वाटले गेले की नाही ते तपासायचे. नंतर चटणीला एक मस्त फोडणी द्यायची.
४. फोडणीसाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल घ्यायचे आणि तेल छान तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्त्याची पाने घालायची आणि परतायचे. छान परतून झाल्यावर त्यात हिंग घालायचे गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावर त्यात चमचाभर हळद घालायची आणि लाल तिखट घालायचे. मस्त ढवळायचे. नंतर तिखट करण्याआधी फोडणी चटणीवर ओतायची.