कैरी पाहिल्यावर तोंडाला पाणी तर सुटतेच. कैरीचं पन्हं , लोणचं आहाहाहा!!खायला मजाच काही और येते. पण याच कैरीचा भातही केला जातो. (Easy recipe for raw mango sour-sweet-spicy rice, a summer delight!!!)मार्च ते मेच्या दरम्यान कोकणात हा भात घरोघरी केलाच जातो. शिवाय रेसिपी अगदीच सोपी असल्यामुळे करायला वेळ लागत नाही. कैरी भाताची सोपी रेसिपी पाहा.
साहित्य
कैरी, तांदूळ, सुकी लाल मिरची, जिरे, लसूण, लाल तिखट, पाणी, तेल, कडीपत्ता, मीठ, हळद, कोथिंबीर, मोहरी
कृती
१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. भरपूर लसूण घ्या. त्याशिवाय चव मस्त येत नाही. सुकी लाल मिरची घ्यायची आणि तिचे तुकडे करायचे. कैरी सोलायची. सोलून झाल्यावर मस्त किसून घ्यायची. किमान दोन मोठ्या कैऱ्या तरी हव्या म्हणजे चव येईल.
२. एका फोडणीपात्रात जिरं घ्यायचं. मस्त खमंग भाजायचं. भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये घ्यायचं. त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि लाल तिखट घालायचं. त्याची पेस्ट वाटून घ्यायची. जर मिक्सर नसेल वापरायचा तर पारंपरिक पद्धतीने ठेचूनही करु शकता. चटणी एकजीव होईल याची काळजी घ्यायची.
३. तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि कुकर लावायचा. मोकळा भात करायचा. पाणी जरा कमी ठेवायचे, म्हणजे मोकळा भात मिळतो. बासमती वापरला तर अति उत्तम. भात तयार झाल्यावर तो परातीत पसरवायचा, गार करायचा. मोकळा करायचा.
४. कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम करायचे आणि मग त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. परतायचे आणि मग त्यात सुकी लाल मिरची घालायची. तयार केलेले पेस्ट घालायची आणि खमंग परतायची. पेस्ट परतून झाल्यावर त्यात कैरीचा किस घालायचा. कैरी छान सुगंधी होईपर्यंत परतायची. नंतर त्यात मोकळा केलेला भात घालायचा आणि ढवळून एकजीव करायचे. शेवटी कोथिंबीर घालायची आणि एक वाफ काढून घ्यायची. गरमागरम कैरी भात नक्की करा.
