नवरात्रीच्या (Navratri 2025) नऊ दिवसांच्या उपवासानंतर येणाऱ्या दसऱ्याला गोडधोड आणि मिष्टान्नाचे जेवण बनवण्याची खास प्रथा आहे. यात वेगवेगळ्या प्रांतात विविध पदार्थ बनवले जातात. पण एक पदार्थ असा आहे जो उत्सवाचा आनंद द्विगुणित करतो, तो म्हणजे खमंग आणि स्वादिष्ट व्हेज पुलाव. व्हेज पुलाव झटपट तयार होणारा, पोटाला तृप्ती देणारा आणि मुख्य म्हणजे सर्व भाज्यांच्या संगमामुळे पौष्टिकही असतो. यंदाच्या दसऱ्याला हा गरमागरम व्हेज पुलाव नक्की करून पाहा. पुलावची झटपट, सोपी रेसिपी पाहूया. (Dusshera Special Veg Pulao Recipe)
पुलावसाठी लागणारं साहित्य
बासमती तांदूळ: १ कप
बारीक चिरलेल्या भाज्या : १ ते १.५ कप
कांदा (उभा चिरलेला): १ मध्यम
टोमॅटो (चिरलेला): १/२
आलं-लसूण पेस्ट: १ चमचा
तूप किंवा तेल: २ मोठे चमचे
पाणी: २ कप
मीठ: चवीनुसार
गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला: १ चमचा
हळद: १/२ चमचा
हिरवी मिरची: २
खडे मसाले- आवश्यकतेनुसार
पुलाव करण्याची खास रेसिपी
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटे बाजूला भिजत ठेवा. कुकर किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप/तेल गरम करा. त्यात जिरे आणि सर्व खडा मसाला (तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची) घालून सुगंध येईपर्यंत परता.
आता उभा चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून १ मिनिट परता. चिरलेला टोमॅटो आणि सर्व चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, फ्लॉवर इ.) घालून २ ते ३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्या.
हळद, गरम मसाला/बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा. भिजवलेले तांदूळ हलक्या हाताने निथळून घ्या आणि या मिश्रणात घाला. तांदूळ तुपात एक मिनिट परतून घेतल्याने पुलाव मोकळा होतो. २ कप पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी आणि मीठ व्यवस्थित तपासा. झाकण लावून (कुकर असेल तर १ शिटी घेऊन) मंद आचेवर ८ ते १० मिनिटे शिजू द्या. पुलाव तयार झाल्यावर लगेच झाकण काढू नका. ५ मिनिटे तसेच 'दम'वर ठेवा. तयार आहे गरमागरम व्हेज पुलाव.