Side Effects of Paanipuri : पाणीपुरीचं नाव जरी काढलं ना की तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी हे भारतातील सगळ्यात लोकप्रिय असं स्ट्रीट फूड आहे. लहान असोत वा मोठे सगळेच मोठ्या चवीनं पाणीपुरीचा आनंद घेतात. अनेक लोक तर एकाचवेळी एकावर एक कितीतरी पाणीपुरी फस्त करतात. पण चटपटीत, आंबट, तिखट लागणाऱ्या या पाणीपुरी खाताना जरा काळजीही घेतली पाहिजे. कारण जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी आपल्याला गंभीर आजारी पाडू शकते.
दिल्ली एम्सच्या जनरल फिजिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी पाणीपुरी खाताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. पाणीपुरी खाण्याआधी दोनदा नक्की विचार करा, कारण यापासून इन्फेक्शनचा धोका सगळ्यात जास्त असतो. चला तर पाहुयात पाणीपुरी खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
पाणीपुरी खाताना बाळगा सावधगिरी
डॉक्टर प्रियंका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानी पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी कसं नुकसानकारक आहे याबाबत माहिती दिली आहे. सामान्यपणे जास्तीत जास्त पाणीपुरीमध्ये वापरलं जाणारं पाणी स्वच्छ नसतं. पाण्यात बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. असाच एक व्हायरस म्हणजे हेपेटायटिस ए आहे. ज्याबाबत आपण काहीतरी ऐकलं असेलच. व्हायरस वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण हेपेटायटिस ए दुषित अन्न आणि पाण्यातून पसरतो. हा व्हायरस आपल्या आतडीला प्रभावित करतो आणि काविळचं कारण ठरतो.
लहान मुलांसाठी घातक व्हायरस
डॉक्टर सांगतात की, लहान मुलांसाठी हेपेटायटिस ए हा व्हायरस खूप घातक असतो. या व्हायरसमुळे लहान मुलांचं लिव्हर वेगाने फेल होऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड देणं टाळलं पाहिजे. स्ट्रीट फूड खात असालच तर काळजी घेतली पाहिजे. त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे स्ट्रीट फूड खाणंच टाळलं पाहिजे. कारण ते अनेकदा दुषित पदार्थ आणि पाण्यात बनवलेले असतात. जर आपल्या जुलाब लागले असतील, ताप आला असेल, डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
आणखी काय काळजी घ्याल?
उत्सवात किंवा एखाद्या कार्यक्रमात बाहेरची पाणीपुरी खाणं टाळलं पाहिजे. जर पाणीपुरी खायची इच्छा असेलच तर बाजारातून पुऱ्या विकत आणा आणि घरी त्यासाठी पाणी तयार करा. बाहेर पाणीपुरी खायचीच असेल तर अशा ठिकाणी खावी जिथे स्वच्छता असेल, आपल्याला विश्वास असेल. कारण टेस्टपेक्षा आपलं आरोग्य अधिक महत्वाचं आहे.
पाणीपुरीच्या पाण्यात अॅसिड नाही कसं ओळखाल?
मिठाचं अॅसिड
आजकाल खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. याद्वारे एकप्रकारे लोकांना स्लो पॉयझन दिलं जात आहे. कारण यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जास्तीत जास्त लोक पाणीपुरी खातात. पण दुकानदार आपल्यासाठी त्यात भेसळ करतात. पाणीपुरीचं पाणी आणखी टेस्टी बनवण्यासाठी दुकानदार त्यात मिठाचं अॅसिड टाकतात. हे अॅसिड त्यांना दुकानात सहजपणे मिळतं.
कसं ओळखाल?
पाणीपुरीच्या पाण्यात काही भेसळ असेल तर तुम्ही ती ओळखू शकता. ज्या भांड्यात पाणीपुरीचं पाणी ठेवलं आहे ते बारकाईने बघा. जर भांड्याचा रंग हलका झाला असेल तर पाण्यात भेसळ केल्याने असं होऊ शकतं. तसेच जर स्टीलच्या प्लेट्समध्ये पाणीपुरी खात असाल आणि प्लेट्स चमकदार नसेल तर पाण्यात अॅसिड असू शकतं. त्याशिवाय पाणीपुरी खाताना तुम्हाला वाटत असेल की, दातांवर एक थर जमा होत आहे तर पाण्यात भेसळ असू शकते. आणखी एक बाब म्हणजे पाणीपुरीच्या पाण्यात भेसळ असेल तर टेस्ट थोडी कडवट लागते आणि पोटात जळजळ होते. असं काही आढळलं तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता.
