आपल्या रोजच्या स्वयंपाकात तेलाचा वापर अत्यावश्यक असतो. पण प्रत्येक पदार्थासाठी एकच तेल योग्य असतं असं नाही. काही तेलं तळणासाठी चांगली असतात, काही फोडणीला सुगंध देतात, तर काही सॅलेडमध्ये वापरल्यास आरोग्यदायी ठरतात. योग्य तेल निवडल्यास केवळ चवच वाढत नाही, तर शरीरालाही योग्य पोषण मिळतं.(Do you use the same oil for frying and cooking? See which oil is best for what purpose.)
तळणीसाठी सर्वात उत्तम तेल म्हणजे शेंगदाणा तेल. या तेलाचा धूरबिंदू (smoke point) जास्त असल्याने ते उच्च तापमानावरही खराब होत नाही. त्यामुळे वडे, भजी किंवा इतरही तळणीचे पदार्थ करताना हे तेल उत्तम ठरते. शिवाय त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयासाठी चांगले मानले जातात.
फोडणीसाठी मात्र मोहरीचे तेल किंवा तीळाचे तेल उत्तम मानले जाते. मोहरीचे तेल पौष्टिक असले तरी त्याला विशिष्ट वास येतो जो सगळ्यांनाच सहन होत नाही. तीळाच्या तेलाचा सुगंध फोडणीला खास पारंपरिक चव देतो. कांदा, लसूण किंवा मोहरीची फोडणी करताना तीळाचे तेल वापरल्यास चव अधिक खुलते आणि त्यातील कॅल्शियम, आयर्न, जीवनसत्त्व ई हे पोषक घटक शरीराला मिळतात. मोहरीचे तेल थोडे तिखटसर असल्याने उत्तर भारतात भाज्यांच्या फोडणीसाठी ते लोकप्रिय आहे.
सॅलेडसाठी हलके, चवदार आणि पौष्टिक तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल. त्यात ओमेगा-३ आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. हे तेल तापवू नये, म्हणून सॅलेड, सूप किंवा ड्रेसिंगसाठी त्याचा वापर योग्य ठरतो.
पोळीसाठी किंवा थोडेसे तेल लावण्यासाठी साजूक तूप सगळ्यात उत्तम तसेच खोबरेल तेल ही उत्तम पर्याय आहेत. तूप पारंपरिक असून त्यात ब्यूटिरिक अॅसिड असते, जे पचन सुधारते. तर नारळ तेलात मध्यम साखळी फॅट्स असतात, जे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत. विशेषतः कोकणी आणि दक्षिण भारतीय स्वयंपाकात खोबरेल तेल पोळी, डोसा किंवा इडलीची चव अधिक अप्रतिम लागते. थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक तेलाचं स्वत:चं वैशिष्ट्य आहे त्यानुसार त्याचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले ठरेल.
