बहुतेक वेळा आपण कोथिंबीर वापरताना फक्त पानेच घेतो आणि देठ थेट कचऱ्यात टाकून देतो. कोथिंबीर निवडताना पाने आणि देठ वेगळा करणे जरी गरजेचे असते तरी देठ टाकण्याची गरज नसते. प्रत्यक्षात कोथिंबीरीचे देठही तितकेच उपयुक्त आणि पौष्टिक असतात. चव, सुगंध आणि आरोग्याच्या दृष्टीने देठांचा वापर केला तर स्वयंपाक अधिक पोषक आणि शहाणपणाचा ठरतो.
कोथिंबीरीच्या देठांमध्येही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात लोह आढळते. हे घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, पचन सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात कोथिंबीर ही मुळातच अनेक गुणधर्म असलेली भाजी मानली जाते आणि देठांमध्येही ते असतातच. त्यामुळे अंगावर जास्त उष्णता, वारंवार तोंड येणे किंवा पित्ताचा त्रास असताना कोथिंबीरीचे देठ उपयोगी ठरु शकतात. हे देठ अजिबात अपायकारक नाही. ते व्यवस्थित धुवायचे.
देठांमधील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि पोट साफ होण्यास मदत करते. तसेच कोथिंबीरीचा नैसर्गिक सुगंध भूक वाढवतो आणि अन्नाची चव खुलवतो. म्हणूनच फक्त सजावटीपुरती कोथिंबीर न वापरता तिचे संपूर्ण पोषण उपयोगात आणणे फायद्याचे आहे.
कोथिंबीरीचे देठ सूपसाठी खूप छान प्रकारे वापरता येतात. भाज्यांचे सूप, डाळीचे सूप किंवा साधे पाण्यात उकळलेले सूप करताना बारीक चिरलेले देठ घातले तर सूपला छान स्वाद येतो. तसेच फक्त देठांचे वाटण करुन त्याचे कोथिंबीर सूप करता येते. उकळताना त्यातील पोषण पाण्यात उतरते आणि सूप अधिक हलके, पचायला सोपे होते.
देठांची चटणीही करता येते. नेहमीच्या कोथिंबीर-नारळ चटणीत पाने कमी असतील तर देठ घालून चटणी केली तरी ती तितकीच चविष्ट लागते. हिरवी मिरची, लसूण, जिरे, थोडे सैंधव मीठ घालून देठांची चटणी केली तर ती पचनासाठीही चांगली ठरते. काही जण देठ भाजून किंवा थोडे परतून चटणीत घालतात, त्यामुळे चव आणखी खुलते. याशिवाय कोथिंबीरीचे देठ भाजी, आमटी, उसळ, पुलाव किंवा खिचडीतही वापरता येतात. यामुळे अन्नाची चव वाढते आणि अन्नाचा अपव्ययही टाळता येतो. म्हणून पुढच्या वेळी कोथिंबीर वापरताना देठ फेकून देऊ नका. त्यातही पोषण आहे, गुणधर्म आहेत आणि योग्य वापर केला तर आरोग्यासाठी ते नक्कीच फायद्याचे ठरतात.
