तिखट पदार्थ आवडणाऱ्यांसाठी काठियावाडी लाल लसूण चटणी हा एक जबरदस्त आणि चविष्ट पदार्थ आहे. गुजरातच्या काठियावाड भागातून आलेली ही चटणी तिच्या लाल रंगामुळे आणि झणझणीत चवीमुळे प्रसिद्ध आहे. (Do you like spicy food? Then you must try this chutney, kathiyawadi lasun chutney )लसूण, तिखट आणि मसाल्यांचा सुंदर संगम चटणीच्या प्रत्येक घासात जाणवतो. ही चटणी भाकरी, पराठा किंवा साध्या जेवणासोबतही मस्त लागते. तिखट प्रेमींसाठी ही चटणी म्हणजे खरच सुख. चवीला अगदी मस्त असते. तसेच त्यात दह्याचाही वापर केला जातो. पाहा ही चटणी तयार करायची पद्धत.
साहित्य
लसूण, लाल तिखट, तेल, जिरे, दही, पाणी, मीठ
कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण जरा जास्त घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या आणि जिरे जरा ठेचून घ्यायचे. त्याची छान पेस्ट तयार करायची. मिक्सर वापरणे शक्य असेल तर टाळा. कारण मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट होईल. लसणाचे तुकडे राहणार नाहीत .जाडसर पेस्ट असेल तर चटणी जास्त छान लागते.
२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा करम करायचे. तेल गरम झाल्यावर त्यात तयार लसणाची पेस्ट मस्त परतायची. एका वाटीत लाल तिखट घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची. लसूण मस्त खमंग परतून झाल्यावर त्यात तयार केलेली लाल तिखटाची पेस्ट घालायची आणि ढवळून घ्यायचे. छान एकजीव होऊ द्यायचे. चटणी थोडे तेल सोडायला लागली की त्यात दोन चमचे दही घालायचे आणि चवी पुरते मीठ घालायचे. सतत ढवळायचे नाहीतर दही फाटते.
३. चटणी जरा छान उकळली की गॅस बंद करा आणि चटणी गार करुन घ्या. भाकरी आणि ही चटणी अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे. जास्त तिखट खात नसाल तर दही जास्त घाला आणि लाल तिखट कमी घाला. लाल तिखट रंगाचे घ्या. म्हणजे त्याची चव सहन होईल एवढीच तिखट लागेल.
